एक थरार... कडा उतरण्याचा, पाऊस अनुभवण्याचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मार्ग अडचणीचा आहे. पण, तो पायवाटेचा आहे. कारण रोज माचाळचे लोक याच मार्गाने विशाळगडला येतात व परत जातात. त्यामुळे त्यांच्या पायाखालची ती वाट आहे. पण, आपणही या वाटेने खबरदारी घेत जाऊ शकतो. व कोल्हापूर जिल्ह्यातले रानवैभव, वनवैभव, पर्यावरण वैभव अनुभवू शकतो.
- प्रमोद पाटील, संयोजक

कोल्हापूर - हातात गरमागरम चहाचा कप आणि खिडकीजवळ बसून बाहेरचा पाऊस अनुभवण्यातही एक मजा आहे; पण अवघ्या ३०-३५ घरांचं एक गाव, या गावाच्या सभोवती खोल दरी आणि या गावात धुक्‍याच्या लाटांसह अखंड पडणारा बदाबदा पाऊस अनुभवण्यात एक थरार आहे. पण, असा थरार अनुभवायला एकट्या-दुकट्याला जाणे अशक्‍य आहे, मात्र अशा थरार पावसाचा अनुभव घेण्याची संधी येत्या १८ ऑगस्टला कोल्हापूरकरांना मिळेल. विशाळगडाचा कडा भर पावसात दोरखंडाला धरून उतरायचा. 

दरीत उतरलं, की पुन्हा दोरखंडाला धरून समोरचा कडा चढायचा आणि हा कडा चढला, की माचाळ या छोट्याशा गावात पोचायचं. आणि डोंगरातलं बेट म्हणून ओळख असलेल्या या माचाळचा पाऊस अनुभवायचा, असे या थरार मोहिमेचे स्वरूप आहे.
साधारण कडा चढणे किंवा उतरणे हे साहसी गिर्यारोकांना शक्‍य असते. पण, ज्याच्या मनात असा थरार अनुभवाचा आहे व ज्यांची इच्छाशक्ती जबर आहे अशांना या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळेल. विशाळगड ते माचाळ हा स्थानिक रहिवाशांचा पारंपरिक मार्ग आहे.

विशाळगडचा कडा कोल्हापूर जिल्ह्यात, तर समोर माचाळचा कडा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. या माचाळच्या कड्यावर माचाळ हे ३०-३५ घरांचे गाव आहे. या मोहिमेत थरार जरूर आहे. पण, हिल रायडर्स ॲडव्हेंचर्स फाउंडेशनचे कार्यकर्ते सर्व साधनांशी या मार्गात वाटाड्याची भक्कम भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे हा थरार अनुभवणे सोपे होईल. 

विशाळगडावर रोजगारासाठी लोक येतात. ते माचाळ गावचे आहेत. अवघ्या ३०-३५ घरांचे हे गाव आहे. जसे चारही बाजूंना समुद्र व मध्ये मोकळी जागा असली, की बेट तयार होते. तसे या गावाभोवती चारही बाजूंना दरी असल्याने त्याला डोंगरावरचे बेट म्हणून ओळखले जाते. 

या गावात जाण्यासाठी विशाळगडाच्या उत्तरेकडेचा कडा उतरावा लागतो व कडा उतरला, की लगेच समोर असलेला कडा चढावा लागतो. 

हा कडा चढला, की त्यावरच्या पठारावरचा रस्ता माचाळ गावात पोचतो. या गावासभोवताली दरी असल्याने दरीतून उसळणारा वारा आणि पाऊस निसर्गाचे एक वेगळे रूप दाखवितो. काही तरबेज निसर्गप्रेमी पावसाळ्याचे हे रूप दरवर्षी आवर्जून पाहतात. पण, असा निसर्ग सर्वसामान्यांनाही अनुभवण्यास मिळावा, या हेतूने हिलरायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशनने ही मोहीम सर्वांसाठी म्हणजे मनाची तयारी असलेल्यांना खुली ठेवली आहे. कडा चढण्यासाठी व उतरण्यासाठी आधार म्हणून दोन्ही बाजूंना दोरखंडाचा आधार असेल. विशाळगड उतरून माचाळच्या कड्यावर चढले, की खिडकीतून पाऊस पाहणे आणि बदाबदा पडणारा पाऊस अंगावर झेलणे यातला फरक अनुभवता येणार आहे. 

मार्ग अडचणीचा आहे. पण, तो पायवाटेचा आहे. कारण रोज माचाळचे लोक याच मार्गाने विशाळगडला येतात व परत जातात. त्यामुळे त्यांच्या पायाखालची ती वाट आहे. पण, आपणही या वाटेने खबरदारी घेत जाऊ शकतो. व कोल्हापूर जिल्ह्यातले रानवैभव, वनवैभव, पर्यावरण वैभव अनुभवू शकतो.
- प्रमोद पाटील,
संयोजक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishalgad - Machal trekking by Hill Riders