वायपर

विश्‍वनाथ पाटील, vishvanath१६@gmail.com
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

ध्येयाचा मार्ग सदैव सुस्पष्ट दिसण्यासाठी आपल्या दृष्टीपटलावर चिकटलेले हे विविध पदार्थ वेळीच पुसून टाकण्यासाठी आपणही वायपरचा उपयोग करावा लागतो. हा वायपर म्हणजे आपला विवेक असतो, आपली सद्‌सद्‌विवेकबुद्धी असते. हा विवेकाचा वायपर गरजेनुसार समोरच्या पटलावर फिरवावाच लागतो. चिकटणारे पदार्थ किती गतीने चिकटत आहेत, त्यानुसारही वायपरची गती कमी-जास्त करावी लागते.

आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी तिकडे जाणारा मार्ग नक्की असावा लागतो. अशा पक्‍क्‍या झालेल्या मार्गावर जात असताना आपली नजर शक्‍य तेवढी त्या मार्गावरच खिळलेली असायला हवी. आपल्या नजरेसमोर काही अडथळे आल्यास मार्ग धूसर होऊ शकतो. हा धुरकटपणा वेळीच काढून टाकणे गरजेचे असते. 

चारचाकी गाडीने प्रवास करताना ड्रायव्हरचे सगळे लक्ष समोरच असते. गाडीच्या समोरच्या भागात असणाऱ्या दर्शनी काचेमधून समोरचा रस्ता पाहून त्याचे गाडी चालवणे सुरू असते. गाडीच्या समोरच्या भागात लावलेली ही काच हवेपासून ड्रायव्हर आणि गाडीतील इतर प्रवाशांचे संरक्षण करते. ही काच नसेल तर रस्त्यावरचा काडी-कचरा, धूळ थेट गाडीत बसलेल्या लोकांच्या डोळ्यांत जाऊ शकते. त्यामुळे ही काच सुस्थितीत असायलाच हवी. 

प्रवास सुरू असताना मार्गातील धूळ, धूर, छोटे-छोटे कीटक गाडीच्या काचेवर आपटत असतात. काचेवर आपटून त्यांतले काही बाजूला जातात, तर काही त्या काचेलाच चिकटून बसतात. या अशा चिकटलेल्या पदार्थांचा एक थरच काचेवर हळूहळू जमा होत जातो. तेलकट पदार्थही काचेला चिकटत राहतात. या तेलकट पदार्थांमुळे आणखी धूळ, कीटक काचेवर जमा होऊ लागतात. 

प्रवास करणारी गाडी जसजशी पुढे जाते, तसतशी गाडीची पुढची काच अंधूक होऊ लागते. अशा काचेतून समोरचा रस्ता, त्या रस्त्यावरील खड्डे, अडथळे स्पष्ट दिसत नाहीत. मग ड्रायव्हरला डोळे ताणून पाहावे लागते. अशा वेळी गाडीला अपघातही होऊ शकतो. प्रवास करताना मार्गात पाऊस सुरू झाल्यास पावसाचे पाणी गाडीच्या समोरच्या काचेवर जमा होऊ लागते. या पाण्यामुळे तर समोरचा रस्ता आणखी धूसर होतो. पाऊस खूपच मुसळधार असेल तर अगदी दहा फुटांवरचेदेखील दिसत नाही. मग अशावेळी सगळा प्रवासच धोकादायक होतो. समोरून येणारी धूळ, कीटक आणि कोसळणारा पाऊस या गोष्टी काचेला चिकटतच राहतात; पण चिकटलेल्या या गोष्टी ताबडतोब बाजूला करून समोरची काच लख्ख स्वच्छ करण्याची एक व्यवस्था गाडीमध्ये असते. त्या काचेवर एक रबरी पट्टी फिरण्याची सोय केलेली असते. ही रबरी पट्टी म्हणजे वायपर. हव्या त्या वेगानुसार हा वायपर काचेवर फिरवून समोरची काच स्वच्छ ठेवली जाते. या वायपरमुळेच गाडीच्या ड्रायव्हरला समोरचा मार्ग नेहमी स्वच्छ दिसतो.

आपल्या ध्येयाच्या दिशेने आपला प्रवास सुरू असताना अनेक अडथळे आपल्या दृश्‍य पटलावर येऊन चिकटतात. चिकटणे हा त्यांचा स्थायीभावच असतो. हे पदार्थ आळस, टाळाटाळ, वेळेचा अपव्यय, अकारण घाबरणे, अनावश्‍यक छोट्या गोष्टींमध्ये अडकणे असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या पदार्थांमुळे आपले दृष्टी पटल अंधूक होऊ लागते. समोरचा मार्ग नीट स्वच्छ दिसत नाही. मग मार्गात येणारे खड्डेही दिसणे बंद होऊ लागते. ध्येयाच्या दिशेने जाणारी आपली गाडी मग खड्ड्यांमध्ये अडकू लागते. समोरचे नीट न दिसल्यामुळे एखाद्या तीव्र वळणावर मोठा अपघातही होतो. 

ध्येयाचा मार्ग सदैव सुस्पष्ट दिसण्यासाठी आपल्या दृष्टीपटलावर चिकटलेले हे विविध पदार्थ वेळीच पुसून टाकण्यासाठी आपणही वायपरचा उपयोग करावा लागतो. हा वायपर म्हणजे आपला विवेक असतो, आपली सद्‌सद्‌विवेकबुद्धी असते. हा विवेकाचा वायपर गरजेनुसार समोरच्या पटलावर फिरवावाच लागतो. चिकटणारे पदार्थ किती गतीने चिकटत आहेत त्यानुसारही वायपरची गती कमी-जास्त करावी लागते. हा वायपर नादुरुस्त होऊ नये म्हणून त्याची नियमितपणे देखभालही करावी लागते. सुस्थितीत कार्यरत असणारा हा वायपर मग आपल्याला समोरचा मार्ग नेहमीच स्वच्छ व सुस्पष्ट दिसण्यासाठी मदत करत राहतो.

Web Title: Vishwanath Patil writes in Officer`s wed

टॅग्स