खरोखरच कोल्हापूरचा नाद खुळा

खरोखरच कोल्हापूरचा नाद खुळा

कोल्हापूर - खरोखरच कोल्हापूरचा नाद खुळा. येथील पांढरा-तांबडा जसा आहे, तसाच येथील गोडवा आहे. त्यामुळेच येथून पाऊल बाहेर पडत नाही, असे भावूक उद्‌गार विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी निरोप घेताना काढले. याच वेळी नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी ज्या कोल्हापुरात पोलिस डायरी लिहायला शिकलो, तेथेच आता काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो, असे सांगितले. पोलिस गार्डनमध्ये झालेल्या निरोप-स्वागत समारंभानंतर रेटरेट परेड (जीपला दोरी बांधून ती ओढणे)मधून नांगरे-पाटील यांना निरोप दिला. दरम्यान, सकाळी डॉ. वारके यांनी पदभार स्वीकारला.

श्री. नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘पोलिस सेवेत आता १४ वर्षे राहिली आहेत. महाराष्ट्रात काम केले; पण नाशिकमध्ये केले नव्हते. कोल्हापूर परिक्षेत्रात काम करताना आजपर्यंत १२८ गुन्हेगारांच्या टोळ्यांना मोका, तर १६९ टोळ्यांना तडीपार केले.’’
नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. वारके म्हणाले, ‘‘आयपीएस म्हणून मी जॉईन झालो तेव्हा महाराष्ट्रात करिअरची सुरवात मी कोल्हापूरमधून केली. डायरी कशी लिहायची, तपास कसा करायचा हे येथे शिकलो. अशा पुण्यनगरीत कामाची संधी मिळाली.’’ 

‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी नांगरे-पाटील यांची समाजात मिसळण्याची शैली आणि लोकाभिमुख कार्यभाराची उदाहरणे दिली. त्यांच्यामुळेच आज ग्रामीण भागातील तरुणांचा ओढा स्पर्धा परीक्षांकडे वळल्याचेही सांगितले. संदीप पाटील, सुहैल शर्मा, श्रीनिवास घाडगे, सतीश माने, एकनाथ पाटील, सुजित पित्रे यांच्यासह नामदेव शिंदे, विजय कार्वेकर, मधुरा कोराणे, सतीश शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. 

कुलगुरू देवानंद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. तिरुपती काकडे यांनी आभार मानले.

श्री. नांगरे-पाटील आणि आमचे संबंध ते इंटरव्ह्यू देत होते तेव्हापासूनचे आहेत. शाहू महाराजांनी घालून दिलेली शिकवण म्हणजे येथील एकसंध समाज बांधणी आहे. माझ्या प्रशिक्षणाची सुरवात कोल्हापुरातून झाली आहे. माझ्यासाठी ही जन्मभूमी मानून कार्यरत राहीन.
- डॉ. सुहास वारके,
विशेष पोलिस महानिरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com