लोकांची गरज ओळखून पोलिसिंग: विश्‍वास नांगरे-पाटील 

परशुराम कोकणे
रविवार, 1 एप्रिल 2018

सकाळ म्हणजे ऊर्जा.. 
सकाळ विषयी बोलताना आयजी विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले, सकाळ म्हणजे ऊर्जा असे मी मानतो. सकाळच्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्क, तनिष्का यासह वेगवेगळ्या मंचावरून मी लोकांशी जोडला गेलो आहे. सकाळच्या माध्यमातून रचनात्मक, सकारात्मक उपक्रम सुरू आहेत. महिला आणि तरुणांना संधी देण्याचे कामही सकाळ करीत आहे. 

पोलिसांना वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. एखादी घटना घडायच्या आधी आपल्याला ती थांबविता येईल का याचा विचार मी करत असतो. समाजातील वाईट वृत्ती नष्ट झाली पाहिजे. कारागृहे ही सुधारणा गृहे आहेत. कामाच्या निमित्ताने मी भरपूर प्रवास करतो. कोल्हापूर परिक्षेत्राचा प्रमुख म्हणून महिन्याला पाच ते सहा हजार किलो मीटरचा माझा प्रवास होत आहे. लोकांची गरज ओळखून पोलिसिंग करण्यावर माझा भर आहे. सगळ्या रोगावर एकच इलाज करता येत नाही असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी कॉफी विथ सकाळ उपक्रमात सांगितले. 

सकाळचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी श्री. नांगरे-पाटील यांचे स्वागत केले. सुरवातीला मैं खाकी हूँ.. ही कविता सादर करून पोलिसांची समाजातील नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट केले. आयजी नांगरे-पाटील म्हणाले, माझ्या मातीतल्या माणसांसाठी काम करण्याची संधी मला मिळाली आहे. मी निम्मा सोलापूरचाच आहे. माझे आजोबा खांडवी (ता. बार्शी) गावचे होते. सोलापूरशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहेत. ऍस्ट्रासिटीचा कायदा चांगला आहे. पोलिस उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांना आम्ही तपासाचे अधिकार देतो. एखादी तक्रार खोटी असेल तर रद्द केली जाते. समाजासारखेच पोलिसांमध्येही चांगल्या वाईट दोन्ही प्रवृत्ती आहेत. अधिकाधिक चांगली पोलिसिंग व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. पोलिस ठाण्यात तुम्हाला कशी वागणूक मिळाली, तक्रार व्यवस्थित ऐकून घेतली का, तुम्ही समाधान आहात असे प्रश्‍न नियंत्रण कक्षातून फोन करून फिर्यादींना विचारले जात आहेत. दबावाखाली कोणत्याही गुन्ह्याचा तपास होत नाही. गुन्ह्यातील पुराव्यांच्या आधारांवरच तपास केला जातो. 

लोकांना विश्‍वासात घेऊन जे चांगलं आहे ते मी करतो. त्यामुळेच गेल्या काही दिवसात कोल्हापूर परिक्षेत्रातील सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये फरक पडला आहे. 31 हजार मंडळांनी डॉल्बी लावला नाही. गणेशोत्सवात तर रचनात्मक काम झाले. युथ पार्लमेंट उपक्रमामध्ये 42 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. स्टेजवर येऊन दहशतवाद, सोशल मीडीयाचा वापर, वाहतूक व्यवस्था, स्त्री भ्रूण हत्या यासह इतर विषयावर प्रबोधन झाले. या उपक्रमाची दखल घेऊन शासनाने या प्रकल्पासाठी 35 लाख रुपये मंजूर केले. आधी प्रबोधन आणि शिक्षणावर आम्ही भर दिला आहे त्यानंतर कायद्याची अंमलबजावणी केली जाते असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी कॉफी विथ सकाळमध्ये सांगितले. 

जनता सुरक्षित राहावी यासाठी पोलिस प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे. आता आम्हाला गुगल मॉनिटरिंग सिस्टिम मिळाली आहे. एखाद्या शहरातील, गावातील घटनेवरून सोशल मीडीयावर काय काय व्हायरल होत आहे हे आम्ही शोधू शकतो. अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा वापर होत आहे. 
- विश्‍वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक 

तडीपार, मोका कारवाईवर भर 
निर्भया पथकाच्या माध्यमातून दीड वर्षात वीस हजार टवाळखोरांवर कारवाई केली आहे. यातील 99 टक्के तरुणांचे समुपदेशन करण्यात आले आहे. आवश्‍यकतेनुसार गुन्हेही दाखल केले आहेत. विनयभंग, बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांवरही आता तडीपार करण्याची प्रक्रिया सुुरू आहे. 73 गॅगवर मोकाची कारवाई केली आहे. मटके वाल्यांवरही तडीपारची कारवाई करण्यात येत आहे. सावकारी करणाऱ्या गॅगवरही कारवाई वाढली आहे. वाळू तस्कारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. सावकारांनीही धसका घेतला आहे. कायद्यात अनेक तरतुदी आहेत, त्या वापरल्या पाहिजेत. 

जनता आणि पोलिसांशी संवाद 
दरबारच्या माध्यमातून सामान्य जनतेशी, पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना चार वर्षातून दोन वेळा सहलीसाठी आठ दिवस सुट्टी दिली जात आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शाळा चालविल्या जात आहेत. घरांचा प्रश्‍न सोडविणाऱ्यावरही भर दिला आहे. घर घेण्यासाठी एचडीएफसीकडून कर्ज दिले जात आहे. पगारात पोलिसांचा घरखर्च कसे भागेल याकडेही आमचे लक्ष आहे. पोलिस ठाण्यांच्या खर्चासाठीही आता निधी उपलब्ध करून दिला आहे. 

निर्भया पथकामुळे सकारात्मक चित्र 
पाच जिल्ह्यांमध्ये निर्भया पथकामुळे फरक पडला आहे. महिला पोलिसांना तरुणींसोबत साध्या वेषात पाठवून छुप्या कॅमेऱ्यातून शूटिंग केले आणि गुन्हा दाखल केले. अशा प्रकरणात लवकरात लवकर शिक्षा लावावी यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. विनयभंग, बलात्कार, लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्याची यादी तयार करून तडीपारीची प्रक्रिया राबविण्याची सूचना दिली आहे. महिला पोलिस पाटलांची संख्या वाढली आहे. महिलांचा छळ, अत्याचारांच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी त्यांनी दिली आहे. 

26/11 च्या घटनेनंतर... 
मुंबईत 2008 साली झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर पोलिस प्रशासन आणि शासनाने खूप धडे घेतले आहेत. आधीच्या तुलनेत मुंबईतील घटनेनंतर सर्व विभागांशी समन्वय वाढले आहे. फोर्सवन नावाचे पथक सज्ज आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी शीघ्र कृती दलाचे जवानही सज्ज आहेत. माढा तालुक्‍यातील राहुल शिंदे हा धाडसी तरुण होता. गोळीबारात तो शहीद झाला. त्याला विसरून चालणार नाही असेही श्री. नांगरे-पाटील यावेळी म्हणाले. 

सकाळ म्हणजे ऊर्जा.. 
सकाळ विषयी बोलताना आयजी विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले, सकाळ म्हणजे ऊर्जा असे मी मानतो. सकाळच्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्क, तनिष्का यासह वेगवेगळ्या मंचावरून मी लोकांशी जोडला गेलो आहे. सकाळच्या माध्यमातून रचनात्मक, सकारात्मक उपक्रम सुरू आहेत. महिला आणि तरुणांना संधी देण्याचे कामही सकाळ करीत आहे. 

मन है विश्‍वास.. या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता या पुस्तकाचा दुसरा भाग लिहीत आहे. मला ट्रेनिंगचा फायदा कसा झाला हे यातून मी सांगणार आहे. एक ग्रामीण युवक आयपीएस ऑफीसरमध्ये कसा रूपांतर झाला हे यातून समजून येईल, असे आयजी विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. 

ठळक मुद्दे.. 
- सोलापूरचे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू हे सिंसीअर ऑफिसर. 
- समाजातील द्वेषभावना चांगल्या लोकांनी एकत्र येऊन थांबविली पाहिजे. 
- गावागावातील गुन्ह्यांवर नियंत्रण यावे यासाठी विशेष पोलिस अधिकारी म्हणून नागरिकांना संधी. 
- फिर्यादी आणि साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण सोलापूर जिल्ह्यात अधिक. 
- सायबर सुरक्षेच्या अनुषंगानेही पोलिस आता सक्षम झाले आहेत.

Web Title: Vishwas Nangre Patil statement on police