"व्हीजन 75'साठी कॉंग्रेसने कसली कंबर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

सोलापूर - महापालिकेच्या निवडणुकीत "व्हीजन 75' गाठण्यासाठी शहर कॉंग्रेस समितीने कंबर कसली आहे. त्यासाठी प्रभागनिहाय माहिती गोळा करण्याचे काम सुरु झाले असून, समितीचे सदस्य प्रत्येक नगरसेवक आणि पराभूत उमेदवारांना गाठून माहिती संकलित करीत आहेत.

सोलापूर - महापालिकेच्या निवडणुकीत "व्हीजन 75' गाठण्यासाठी शहर कॉंग्रेस समितीने कंबर कसली आहे. त्यासाठी प्रभागनिहाय माहिती गोळा करण्याचे काम सुरु झाले असून, समितीचे सदस्य प्रत्येक नगरसेवक आणि पराभूत उमेदवारांना गाठून माहिती संकलित करीत आहेत.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माहिती संकलित करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार शहर कॉंग्रेस समितीचे उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, सरचिटणीस राजन कामत व विठ्ठल भंडारी यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे तिघेही महापालिका तसेच नगरसेवकांच्या घरी जाऊन माहिती संकलित करीत आहेत. पराभूत उमेदवारांकडूनही माहिती घेतली जात आहे. ही संपूर्ण माहिती एकत्रित करून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.

नगरसेवक व पराभूत उमेदवारांकडून 2012 मधील माहिती मागविण्यात आली आहे. त्यामध्ये कॉंग्रेसला मिळालेली मते, विरोधकांना मिळालेली मते, नव्या प्रभाग रचनेनुसार कॉंग्रेसमधील इच्छुकांची नावे, प्रभागातील कॉंग्रेस नेत्यांची नावे, पदाधिकाऱ्यांची नावे आणि प्रभागातील महत्त्वाचे प्रश्‍न याची माहिती देणे हे नगरसेवक आणि पराभूत उमेदवारांना बंधनकारक करण्यात आले आहे. जातनिहाय मतदारसंख्येमध्ये मराठा, मुस्लीम, लिंगायत, मोची, दलित, पद्मशाली, ख्रिश्‍चन, ब्राह्मण, मारवाडी, जैन, ढोर, मातंग, कैकाडी, लमाण आणि धनगर समाजाची लोकसंख्या किती आहे याची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

सैफन यांचा नकार ?
शहर समितीऐवजी प्रभागनिहाय निरीक्षकपदी नियुक्ती केल्याबद्दल आझम सैफन यांनी निरीक्षक म्हणून काम करण्यास नकार दिल्याची चर्चा कॉंग्रेस भवन परिसरात सुरू आहे. नियुक्तीपत्र अध्यक्षांनी देण्याऐवजी उपाध्यक्षांकडून दिले गेले. याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

माजी महापौरांनी सुचविली दुरुस्ती
प्रभागीातल माहिती देण्यासाठी नगरसेवक व पराभूत उमेदवारांना देण्यात आलेल्या पत्रकात प्रभागातील जातनिहाय आकडेवारी नमूद करण्यास सांगितले आहे. पत्रकात 15 जातींचा उल्लेख आहे, मात्र "धनगर' जातीचा उल्लेखच नाही. ही बाब माजी महापौर आरीफ शेख यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ती समिती सदस्यांना दाखविली व दुरुस्ती सुचविली. त्याची दखल घेत जातीच्या यादीत "धनगर' समाजाचाही उल्लेख करण्यात आला.

Web Title: Vision 75 Congress worked