विटा नगरपालिका वार्तापत्र : विरोधकांची जनसंपर्कात आघाडी

Vita Municipal Newsletter: Opposition leads in public relations
Vita Municipal Newsletter: Opposition leads in public relations

विटा (जि. सांगली) : सत्ताधाऱ्यांनी शहरातील विकासकामे व स्वच्छता अभियान राबविण्याचे काम जोमाने सुरू केले आहे. सक्रिय नसलेल्या विरोधकांनीही शहरातील नागरिकांच्या समस्या पालिका प्रशासनाकडे मांडत नागरिकांशी जनसंपर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सध्या सत्ताधारी व विरोधक चांगलेच सक्रिय झाल्याचे चित्र आहे. 

पालिकेत सत्ताधारी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाचे तेवीस व विद्यमान आमदार अनिल बाबर गटाचे दोन नगरसेवक आहेत. पालिका निवडणुकीला अद्याप अवधी असला तरी आतापासूनच सत्ताधारी व विरोधकांत विविध समस्या व रस्ता कामावरून जुंपत आहे. विटा-मायणी रस्त्यावरील ओढ्यावरील निकृष्ट दर्जाचा रस्ता डांबरीकरण करावा, यासाठी विरोधी नगरसेवक, कार्यकर्ते यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केले.

रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांकडून घेतले व ठिय्या उठविला. त्याचबरोबर शहरातील नागरिकांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी, यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी विरोधक सक्रिय होऊ लागले आहेत.

प्रभागातील एखाद्या तरुणाचा, नागरिक अथवा ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सत्ताधारी व विरोधक हजेरी लावत आहेत. त्यामुळे आतापासूनच दोन्ही बाजूकडून नागरिकांशी संपर्क साधला जात आहे. 

सत्ताधाऱ्यांची विकासकामे करण्याची घाईगडबड सुरू आहे. याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. या माध्यमातून सत्ताधारी व नागरिकांमध्ये संपर्क वाढू लागला आहे. पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील वॉर्ड रचना व आरक्षणे जाहीर झाल्यानंतर हालचाली गतिमान होणार आहेत. परंतु सत्ताधारी करत असलेल्या विकासकामांवर विरोधक लक्ष ठेवून ज्या ठिकाणी उणिवा आहेत. त्यावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. एकंदरीत सत्ताधारी व विरोधक नागरिकांशी संपर्क वाढवित असल्याचे चित्र आहे. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com