अंड्याला मागणी; मात्र दर कोलमडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

विटा - श्रावण महिना सुरू असूनही अंड्याला चांगली मागणी आहे. व्यापारीही अंडी खरेदी करत आहेत; मात्र अंडी उत्पादन करणाऱ्या पोल्ट्रीधारकांच्या हातात ३ रुपये १० पैसे मिळत आहेत. नेक (अंडी समन्वय समिती) ने किमान ४ रुपये ५० पैसे दर द्यावा, अशी मागणी खानापूर तालुक्‍यातील पोल्ट्रीधारकांतून होत आहे.

विटा - श्रावण महिना सुरू असूनही अंड्याला चांगली मागणी आहे. व्यापारीही अंडी खरेदी करत आहेत; मात्र अंडी उत्पादन करणाऱ्या पोल्ट्रीधारकांच्या हातात ३ रुपये १० पैसे मिळत आहेत. नेक (अंडी समन्वय समिती) ने किमान ४ रुपये ५० पैसे दर द्यावा, अशी मागणी खानापूर तालुक्‍यातील पोल्ट्रीधारकांतून होत आहे.

दुष्काळी स्थितीशी सामना करत खानापूर तालुक्‍यात आर्थिक प्राप्ती करून देणारा पोल्ट्री व्यवसाय अजूनही तग धरून आहे. काही पोल्ट्रीधारकांनी पोल्ट्री व्यवसाय बंद केले. जे सुरू आहेत, त्यात दररोज बारा लाख अंड्यांचे उत्पादन होत आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे. तरीही अंड्याला बाजारात चांगली मागणी आहे. सध्या अंड्याला नेककडून ३ रुपये अडूसष्ट पैसे दर मिळत आहे. त्यात कमिशन वजा जाता पोल्ट्रीधारकांना ३ रुपये दहा पैसे मिळत आहेत.

उन्हाळ्यात उन्हामुळे अंडी उत्पादनावर मोठा परिणाम झाला. परिणामी पोल्ट्रीधारकांना नुकसान सोसावे लागले. पावसाळा सुरू झाला; मात्र पूर्वीप्रमाणे दर मिळेल असे वाटत होते; परंतु आता अंड्याला दरही मिळेनासा झाल्याचे पोल्ट्रीधारक सांगत आहेत. कोंबड्यांचे खाद्य तयार करण्यासाठी पोल्ट्रीधारक मका वापरतात. यावर्षी जून महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी मक्‍याची लागवड केली नाही. शेतकऱ्यांकडून मका व्यापाऱ्यांनी अगोदरच मका खरेदी करून साठा केला आहे. शेतकऱ्यांकडे मका नसल्याने पोल्ट्रीधारकांना व्यापाऱ्यांकडून मका खरेदी करावा लागत आहे. गतवर्षी एक हजार तीनशे रुपये क्विंटल मका होता. आता एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल झाला आहे. क्विंटलमागे साडेतीनशे रुपये दर व्यापाऱ्यांनी वाढविला आहे. त्यामुळे अंड्याला अपेक्षेप्रामणे दर मिळत नाही.

व्यापाऱ्यांकडून जादा दराने मका खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी पोल्ट्रीधारकांची कुचंबणा होऊ लागली आहे. म्हणूनच नेकने अंड्याला दर वाढवून द्यावा, तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मका व्यापाऱ्यांची बैठक घेऊन मका उपलब्ध करून द्यावा. 
- शत्रुघ्न जाधव, पोल्ट्रीधारक.

Web Title: vita news egg demand increase but rate decrease