विठ्ठलाच्या दर्शनासाठी धावणार ‘विठाई’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

सांगली - प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्‍य धावणाऱ्या ‘एसटी’ च्या ताफ्यात पंढरपूरचे वारकरी आणि विठ्ठल भक्‍तांसाठी ‘विठाई’ ही नवीन बस आली आहे. बसवर विठ्ठल आणि वारकऱ्यांचे चित्र झळकत आहे. मिरज आगारात ही बस दाखल होईल. तर २४ डिसेंबरला पंढरपूर येथून तिचा प्रारंभ होईल.

सांगली - प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्‍य धावणाऱ्या ‘एसटी’ च्या ताफ्यात पंढरपूरचे वारकरी आणि विठ्ठल भक्‍तांसाठी ‘विठाई’ ही नवीन बस आली आहे. बसवर विठ्ठल आणि वारकऱ्यांचे चित्र झळकत आहे. मिरज आगारात ही बस दाखल होईल. तर २४ डिसेंबरला पंढरपूर येथून तिचा प्रारंभ होईल. त्यानंतर ती ‘मिरज-पंढरपूर’ मार्गावर ती नियमित धावेल.

खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करत एसटीने अस्तित्व टिकवले आहे. शासनाकडून मदत मिळत नसताना देखील एसटी शासनाला उत्पन्न मिळवून देते, तसेच स्वत:चा खर्च भागवते. खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी एसटीच्या ताफ्यात अलीकडच्या काळात ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ या आराम बसेस दाखल झाल्या आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्‍य खऱ्या अर्थाने एसटी ने जपले आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा याप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांची एसटी ही मूलभूत गरज आहे.

अपघातापासून सुरक्षित
एसटी बसेसची बॉडी आतापर्यंत ॲल्युमिनियममध्ये असते; परंतु आता ‘एमएस’ स्टीलचा वापर करण्यात येत आहे. त्यानुसार ‘विठाई’ देखील ‘एमएस’ स्टीलमध्ये बनवली आहे. त्यामुळे तिची मजबुती वाढली आहे. अपघातामध्ये नुकसान होऊ नये यासाठी दक्षता घेतली आहे.

एसटी महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी  गेल्या काही वर्षांत अनेक सवलती आणल्या आहेत. त्यामुळे आजही वाट पाहीन पण एसटीनेच जाईन असे प्रवासी म्हणतात. एसटीने नुकतेच पंढरपूरला जाणारे वारकरी आणि भक्त यांच्यासाठी ‘विठाई’ ही विशेष बस आणली आहे. ज्या विभागातून पंढरपूरला बसेस जातात त्या विभागात एकेक ‘विठाई’ बस दिली आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्याला देखील ही बस मिळाली आहे. मिरज आगारातून पंढरपूर मार्गावर ती धावेल. 

पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने ‘विठाई’ ची रचना आकर्षक बनवली आहे. बसच्या बॉडीवर विठ्ठल आणि वारकरी यांचे चित्र आहे. पांढऱ्या आणि लाल रंगात ती उठून दिसते. आतमध्ये आरामदायी आसन व्यवस्था आहे. खिडक्‍या मोठ्या आणि हवेशीर आहेत. तसेच नियमित बसपेक्षा याची उंची वाढवली आहे.

जिल्ह्याला प्राथमिक टप्प्यात एक बस मिळाली आहे. प्रतिसाद पाहून ‘विठाई’ ची संख्या वाढवली जाईल. २४ रोजी पंढरपूर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार आहेत. त्यावेळी तेथून ‘विठाई’ चा प्रारंभ होईल.

Web Title: Vithaee Bus for Pandharpur