विठ्ठल गंगा बेंद ओढ्याच्या पुनरुज्जीवनाची योजना

अभय दिवाणजी
शनिवार, 7 एप्रिल 2018

सकाळ माध्यम समूह जलसंधारणासाठी करीत असलेल्या कार्यामुळेच आम्हाला बेंद ओढा पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणा मिळाली. पुनरुज्जीवनाचे काम लवकरच सुरू करीत आहोत. 
- धनराज शिंदे, अध्यक्ष, माढा वेल्फेअर फाउंडेशन 

सोलापूर : माढा वेल्फेअर फाउंडेशनने बेंद ओढ्याच्या पुनरुज्जीवनाची योजना आखली असून त्याला "विठ्ठल गंगा' बेंद ओढा प्रकल्प असे नाव देण्यात आले आहे.

लोकवर्गणी, सीएसआर फंड आणि शासनाच्या मदतीतून हे काम उभारण्यात येणार आहे. या कामाचा प्रारंभ रविवारी (ता. 15) होणार आहे. ओढ्याच्या पुनरुज्जीवनाचे सोलापूर जिल्ह्यातील हे दुसरे मोठे आदर्श उदाहरण ठरणार आहे. या योजनेतून 34 किमीचे रुंदीकरण होईल. त्यातून 62 हजार एकर जमिनीला लाभ मिळणार आहे. 
सांगोला तालुक्‍यातील कटफळ ते शेळवे अशा 42 किमी अंतराचे कासाळगंगा ओढ्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयोग सांगोला तालुक्‍यातील नागरिकांनी सुरू केला आहे. त्यातील 22 किमीचे काम पूर्णत्वास आले आहे. या कामामुळे ओढ्याला नदीचे रूप आले असून लोकवर्गणी, शासन निधी आणि सीएसआर फंडाची मदत मिळाली आहे. या कामासाठी नाम फाउंडेशन, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि टाटा कन्सल्टन्सीचे मोठे सहकार्य मिळाले. 

माढा तालुक्‍यातील बेंद ओढ्याचे पुनरुज्जीवन करण्याचा माढा वेल्फेअर असोसिएशनचा विचार सुरू असतानाच पंचायत समिती सदस्य व या योजनेचे जनक असोसिएशनचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी सहकाऱ्यांसमवेत कासाळगंगा ओढ्याची पाहणी करून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बेंद ओढ्याचे काम करण्याचा निर्धार केला. मजल दरमजल करीत अनेक शासकीय अडचणींचा सामना होत-होत अखेर या योजनेचा प्रस्ताव पूर्णत्वास आला. विशेष म्हणजे उजनीतून सीनेच्या बोगद्यात सोडलेले पाणी अतिरिक्त झाल्यास त्याचा या ओढ्याला लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा ओढा वाहता राहील. हे शाश्‍वत पाणी माढा तालुक्‍यातील काही भागास वरदान ठरणार आहे. 

माढा तालुक्‍यातील 13 गावांना लाभ 
ढवळस, पिंपळखुंटे, चोबे पिंपरी, कुर्डू, कुर्डुवाडी, भोसरे, वेताळवाडी, वडाची वाडी, रणदिवे वाडी, वडशिंगे, तडवळे, उंदरगाव, महातपूर 

- 200 कोटी लिटर पाण्याची बचत होणार 
- 62 हजार एकर जमिनीला पाणी मिळणार 
- 13 गावांचे लाभक्षेत्र 
- शासकीय निविदेनुसार नऊ कोटी 37 लाखांचा खर्च 
- शासकीय निधीमध्ये 70 टक्के बचत 
- ओढ्यावर 60 हून अधिक बंधारे उपलब्ध 

सकाळ माध्यम समूह जलसंधारणासाठी करीत असलेल्या कार्यामुळेच आम्हाला बेंद ओढा पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणा मिळाली. पुनरुज्जीवनाचे काम लवकरच सुरू करीत आहोत. 
- धनराज शिंदे, अध्यक्ष, माढा वेल्फेअर फाउंडेशन 

Web Title: vitthal ganga bend odha project