श्री विठ्ठल मंदिर समितीवर नवीन सदस्य

अभय जोशी
गुरुवार, 5 एप्रिल 2018

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समिती अधिनियमात दुरुस्ती करुन एक सह अध्यक्ष आणि समितीच्या सदस्यांची संख्या पंधरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानंतर पंधरा जणांची स्वतंत्र सल्लागार समिती देखील नियुक्त करण्याचे शासनाने ठरवलेले आहे.

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीवर शासनाने गहिनीनाथ महाराज औसेकर यांची सहअध्यक्ष म्हणून निवड केली असून काल आणखी सहा नवीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, अतुल महाराज भगरे गुरुजी, ऍड. माधवी निगडे, शिवाजीराव मोरे, प्रकाश महाराज जवंजाळ , विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी कराड येथील भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ.अतुल सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार राम कदम, भास्करगिरी गुरु किसनगिरी बाबा, सचिन अधटराव, संभाजी शिंदे, डॉ. दिनेश कदम, शकुंतला नडगिरे आणि पदसिध्द सदस्य नगराध्यक्षा साधना भोसले यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. परंतु त्यावेळी वारकरी प्रतिनिधींना या समितीवर पुरेसे स्थान मिळालेले नाही या कारणावरुन ऐन आषाढी यात्रेच्या वेळी काही महाराज मंडळींनी पालख्या पंढरपूर शहरात प्रवेश करताना पालख्या थांबवून ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर देखील ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर आणि अन्य काही मंडळींनी आंदोलन केले होते. त्यावेळी सदस्यांची संख्या वाढवून वारकरी प्रतिनिधींनी त्यामध्ये जास्तीतजास्त स्थान दिले जाईल असे आश्‍वासन देण्यात आले होते.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समिती अधिनियमात दुरुस्ती करुन एक सह अध्यक्ष आणि समितीच्या सदस्यांची संख्या पंधरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानंतर पंधरा जणांची स्वतंत्र सल्लागार समिती देखील नियुक्त करण्याचे शासनाने ठरवलेले आहे.

मंदिर समितीवर वारकरी प्रतिनिधी आणखी घ्यावेत यासाठी आंदोलनाचे नेतृत्व केलेल्या ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर यांच्यासह अन्य काही वारकरी सांप्रदायातील मंडळींना समितीवर स्थान देऊन शासनाने या संदर्भात दिलेले आश्‍वासन पूर्ण केले असल्याचे मानले जात आहे. ज्यांची मंदिर समितीवर नियुक्ती होऊ शकलेली नाही अशा अन्य इच्छुकांची सल्लागार समितीवर नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: vitthal mandir committee in Pandharpur