विठ्ठल-रुक्मिणीला थंडीमुळे कानावर कानपट्टी आणि शाल, रजई

अभय जोशी
रविवार, 2 डिसेंबर 2018

श्री विठ्ठल-रुक्मिणी ला थंडीचा त्रास होऊ नये यासाठी कानावर कानपट्टी बांधून अंगावरून शाल आणि रजई घातली जाते. कानपट्टी म्हणून सुमारे दोन ते अडीच मीटर लांबीचे करवतीकाठी उपरणे घडी घालून देवाच्या दोन्ही कानावरून प्रेमाने घट्ट बांधले जाते. शाल आणि रजई देखील घातली जाते. पहाटे नित्य पूजा झाल्यावर सुद्धा पहाटेच्या वाऱ्याचा देवाला त्रास होऊ नये म्हणून काही वेळ पुन्हा देवाच्या दोन्ही कानावरून पट्टी बांधली जाते.

पंढरपूर : यथा देहे तथा देवे.. या उक्तीप्रमाणे सावळ्या विठुरायाच्या बाबतीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रथा-परंपरा आहेत. विविध ऋतुमानात आपण आपली आणि आपल्या कुटुंबीयांची जशी काळजी घेतो त्याचप्रमाणे विठुरायाची देखील काळजी घेतली जाते. सध्या थंडीचा मौसम सुरू असल्याने राजस सुकुमाराला  अर्थात सावळ्या विठुरायाला थंडी वाजू नये म्हणून त्याच्या कानावर कानपट्टी बांधून अंगावर शाल आणि रजई घातली जात आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी ला थंडीचा त्रास होऊ नये यासाठी कानावर कानपट्टी बांधून अंगावरून शाल आणि रजई घातली जाते. कानपट्टी म्हणून सुमारे दोन ते अडीच मीटर लांबीचे करवतीकाठी उपरणे घडी घालून देवाच्या दोन्ही कानावरून प्रेमाने घट्ट बांधले जाते. शाल आणि रजई देखील घातली जाते. पहाटे नित्य पूजा झाल्यावर सुद्धा पहाटेच्या वाऱ्याचा देवाला त्रास होऊ नये म्हणून काही वेळ पुन्हा देवाच्या दोन्ही कानावरून पट्टी बांधली जाते.

उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सुमारे नव्वद दिवस दररोज देवाला चंदन उटी पूजा केली जाते. श्री विठ्ठल-रुक्मिणी च्या या पूजेसाठी दररोज सुमारे 400 ग्रॅम चंदन उगाळून संपूर्ण अंगावर लावले जाते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या काळात जास्तीत जास्त भाविकांना दर्शन व्हावे यासाठी देवाचा पलंग काढला जातो आणि मंदिर 24 तास उघडे ठेवले जाते.

यात्रा काळात भाविकांना दर्शन देण्यासाठी देव अखंड उभा असतो. भक्तांना दर्शन देण्यासाठी सतत उभारून दमलेल्या विठुरायाचा थकवा दूर व्हावा यासाठी देवाच्या अंगाला सुगंधी तेलाने मॉलिश केले जाते. लवंग, वेलदोडे, दालचिनी, गवती चहा, खारीक, बदाम, तुळस आदी घालून बनवलेला काढा प्रक्षाळ पूजे दिवशी देवाला दाखवण्याची देखील प्रथा आहे.  दमलेल्या देवाला लिंबू साखर लावून गरम पाण्याने स्नान घातले जाते.

ऋतुमानाप्रमाणे नैवेद्यात देखील बदल करण्याची परंपरा आहे. देवाच्या नैवेद्यात थंडीत बासुंदी, उन्हाळ्यात आमरस तर अन्य काळात श्रीखंडाचा समावेश केला जातो.

Web Title: Vitthal-Rukmini Shal, Razai due to the cold in Pandharpur