स्त्रीवादी, परिवर्तवादी, विज्ञानवादी वैष्णवजन - दादा महाराज 

संजय पाठक
मंगळवार, 18 एप्रिल 2017

एका कंपनीनं गुटखापुडीची जाहिरात करणाऱ्या मेनकापडाच्या कुंच्या वारकऱ्यांना वाटचालीदरम्यान दिल्या. पावसापासून बचाव होतोय, जमलं तर रात्री अंग टाकायलाही उपयोग होतोय म्हणून भाबड्या वारकऱ्यांनी त्या कुंच्या घेऊन डोक्‍यावर पांघरून वाटचाल सुरू केली. व्यसनांपासून दूर राहा ही संतांची शिकवण अंगी भिनलेल्या दादांना मात्र ही गोष्ट खटकली. 
 

एका कंपनीनं गुटखापुडीची जाहिरात करणाऱ्या मेनकापडाच्या कुंच्या वारकऱ्यांना वाटचालीदरम्यान दिल्या. पावसापासून बचाव होतोय, जमलं तर रात्री अंग टाकायलाही उपयोग होतोय म्हणून भाबड्या वारकऱ्यांनी त्या कुंच्या घेऊन डोक्‍यावर पांघरून वाटचाल सुरू केली. व्यसनांपासून दूर राहा ही संतांची शिकवण अंगी भिनलेल्या दादांना मात्र ही गोष्ट खटकली. 
 
स्थळ - सासवडचा पालखी तळ... वेळ ः साधारणतः सायंकाळी साडेसात - पावणे आठची... उपस्थिती - ह. भ. प. ऍड. विवेकानंद वासकरमहाराज (दादा) व माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अन्य प्रमुख मानकरी... दादा अतिशय रागावलेले... तावातावाने ते बोलत असताना पालखीतळावरील अंधारातही त्यांच्या मानेच्या शिरा स्पष्ट दिसत होत्या... नाकपुड्या फुणफुणत होत्या... "हे पाहा... तुम्ही कोण असाल... कुठले संस्थानिक असाल... असाल ते असाल... मला ते माहिती नाही. पण जर का तुम्ही दिंडीतील महिलां भगिनींप्रती अशा वाईट पद्धतीने वर्तन करणार असाल तर तुमच्या दिंडीचीच काय, तुमच्या सेवेचीही माऊलींना गरज नाही... तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा... अन्‌ ताई, तुम्ही आजपासून वासरकराच्या फडाच्या अतिथी आहात. नका जाऊ असल्या दिंडीत. हा तुमचा भाऊ आहे नं इथं काय लागेल ते सांगा. वासकरांचा फड तुमचाच आहे. आजपासून तुम्ही आमच्या दिंडीत चाला, इथंच भजन - पूजन करा. बाकी मीा पाहतो...' 

कुठल्यातरी दिंडीत मालकी हक्कावरून वाद सुरू होता. तो पालखी निघण्यापासून दादांच्या कानावर आला होता, पण माऊलीच यातून मार्ग काढतील व त्या दिंडीतील तो वाद वाटचालीत संपेल अशी आशा बोलून दाखवून दादांनी त्याकडं कानाडोळा केला. परंतु आळंदी ते पुणे या वाटचालीत या दिंडीतील विधवा महिलेशी दिंडीच्या मालकी हक्कावरून खूप वाईट वर्तवणूक विद्यमान पुरुष दिंडीमालकांनी केल्याचे दादांना समजले. त्यावरून दादा रोखठोक बोलत होते, महाभयंकर चिडले होते. विशेषतः, वयोवृद्ध वारकऱ्यांबाबत, स्त्री भाविकांबाबत दादांची भूमिका खूप संवेदनशील असायची. "पराविया नारी माते समान' या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार दादांची स्त्रीयांबाबतची भूमिका असायची. यातूनच दादांनी "त्या' दिंडीतील वादाबाबत रोखठोक भूमिका घेतली. 

माऊली बरोबर आहेतच, परंतु अशा दिन, अनाथ, वयोवृद्ध, अबलांची काळीज घेण्याची जबाबदारी माऊलींच्या पालखीचे मानकरी या नात्याने माऊलींनी आपल्याला बहाल केली आहे, त्यापासून आपण तसूभरही ढळता कामा नये, अन्यथा "वर'गेल्यावर माऊलींना आपण तोंडही दाखवू शकणार नाहीत, असे ते नेहमी बोलून दाखवत. पालखीत स्त्रिया, वृद्ध वारकऱ्यांची काळजी दादांच्या नुसती मनातच नव्हे तर कृतीतूनही अशी दिसायची. यातूनच दादा हे संतांना अभिप्रेत असे मानवतावादी वारकरी होते, याची प्रचिती यायची...! 

पालखीच्या वाटचालीत कुठल्यातरी गुटखा कंपनीने एकवर्षी पावसाळ्याचे निमित्त साधून गुटखापुडीची जाहिरात करणाऱ्या मेनकापडाच्या कुंच्या दिल्या. पावसापासून बचाव होतोय, जमलं तर रात्री अंग टाकायलाही उपयोग होतोय म्हणून भाबड्या वारकऱ्यांनी त्या कुंच्या घेऊन डोक्‍यावर पांघरून वाटचाल सुरू केली. व्यसनांपासून दूर राहा ही संतांची शिकवण अंगी भिनलेल्या दादांना मात्र ही गोष्ट खटकली. कशीतरी त्या दिवसाची वाटचाल पूर्ण झाल्यावर सायंकाळी समाज आरती झाल्यानंतर दादांनी अन्य दोन प्रमुख मानकऱ्यांना अनौपचारिक गप्पाटप्पांसाठी वासकरपालावर बोलावलं. कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या स्वभावाप्रमाणे रोखठोकरित्या दादांनी मुख्य विषयाला हात घालत गुटख्याच्या जाहिराती करणाऱ्या कुंच्या अन्य समाजाचा त्याला मिळत असलेला वाढता पाठिंबा यावर नाराजी व्यक्त केली. "शहाणे करून सोडावे सकल जनासी'या संतउक्तीच्या विरुद्ध हे वर्तन असल्याचे सांगून आपणच जर समाजाला या अशा कुंच्यांचा वापर न करण्याबाबत प्रबोधन केले तर...' असा प्रस्ताव मांडला. आत्तापर्यंत ही बाब अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या थोडीही लक्षात आलेली नव्हती पण दादांनी या विषयाला हात घातल्याबरोबर त्यांच्या डोक्‍यात लख्ख प्रकाश पडला अन्‌ पुढच्या वाटचालीत धो धो पाऊस असूनही एकाही वारकऱ्याच्या डोक्‍यावर गुटख्याची जाहिरात करणारी कुंची नव्हती...! होती ती छत्री, एखादी फाटकी तुटकी प्लॅस्टिकची पिशवी, गोणपाटाची कुंची...! प्रबोधन काय फक्त कीर्तन, प्रवचनातूनच करायची बाब नव्हे तर ही बारा महिने आठराकाळ सतत, सलगपणे जगण्याची प्रवृत्ती आहे असे दादा म्हणत. 

परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, संतांनाही विविध गोष्टीत परिवर्तनच हवे होते. आपणही समाजाचे प्रतिनिधित्व करताना परिवर्तनशील असावे, समाजोद्धारासाठी काही जुन्या व चुकीच्या प्रथा-परंपरांना विरोधच करायला हवा, याविषयावरही दादा ठाम असायचे. भले यासाठी लागेल ती किंमत मोजायची त्यांची तयारी असायची. दिवसेंदिवस माऊलींबरोबरचा समाज वाढत चाललेला. विस्तीर्ण असे पालखीतळही काळानुरूप कमी पडू लागले. सहाजिक तळावरील जागा वाढत्या लोकसंख्येला पुरेनासी झाली. तरीही समाज त्या अडचणीत, छोट्याच्या जागेतच राहात असे. दिवसभराचा वाटचालीतील थकवा, त्यात विश्रांतीसाठी रात्री अशी अपुरी जागा यामुळे अनेक समाज बांधवांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला. दर वाटचालीतील टप्यावर अँब्युलन्सपुढे गर्दीची रांग वाढती दिसू लागलेली. शेवटी दादांनी एकावर्षी वाल्हेच्या पालखीतळावर अगोदरच येऊन सर्व डॉक्‍टर बांधवांना आपल्या पालापुढे बोलावून चहापान केले. सर्वांची विचारपासू करत मुळ मुद्याला हात घातला. 

दादा म्हणाले, "डॉक्‍टरसाहेब मला एक सांगा, सध्या तुमच्याकडे सर्वाधिकार कोणत्या आजाराचे पेशंट येत आहेत...?' 
डॉक्‍टर, "दादा... थकवा, पायदुखी, अंगदुखी वगैरै...' 
दादा, "पण ते तर दरवर्षीचेच आहे नं, मग यंदा इतकी गर्दी का बरं होतीय तुमच्या अँब्युलन्सपुढे...?' 
डॉक्‍टर, "डोंट नो... बटस्‌ इटस्‌ फॅक्‍ट... पण एक मात्र आमचं निरीक्षण आहे, तेच ते पेशंट पुन्हा पुन्हा येताहेत...' 
बस्स... इतक्‍याच्या माहितीच्या आधारावर दादांनी याविषयी विविध तज्ज्ञांशी चर्चा केली, अन्य एका निष्कर्षाप्रत पोचले. तो निष्कर्ष होता, प्रत्येक राहूटीतीली माणसांची संख्या वाढलीय. परिणामस्वरूप कोणालाच मनाजोगी विश्रांती मिळत नाहीऐ. पण माऊलींना सोडून, म्हणजे पालखीतळ सोडून कुठं जायचं नाही, ही प्रत्येकाच्या मनातली भाबडी कल्पना त्यांना तिथंच छोट्याशा जागेत राहायला भाग पाडत होती. यामुळे आजाराचे प्रमाण वाढत होते. याठिकाणी दादांमधील परिवर्तनवाद लख्खपणे पुढे आला. मग त्यांनी अशा कमी जागा असलेल्या राहूट्यांच्या प्रमुखांना बोलावून घेतले. त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देत, वाटचालीत विश्रांती कशी महत्वाची आहे व त्याचा माऊलांच्या पालखीतळाचा काहीही संबंध कसा नाही. विश्रांती घेण्यासाठी अन्यत्र जाणे म्हणजे काही पाप नव्हे, असं बरंच काही प्रबोधन करून समाजाच्या मनामध्ये संतांना अभिप्रेत असा परिवर्तवाद पेरला. यातून एक झाले, पुढच्या वारीपासून अँब्युलन्सपुढील पेशंटची गर्दी कमी झाली. भोळ्याभाबड्या, अशिक्षित वारकऱ्यांबरोबरच तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मनातही दादांची प्रतिमा उंचावली...!

Web Title: vivekanand vaskar maharaj interview