वन्यप्राणी गणनेत आता स्वयंसेवकही!

शैलेन्द्र पाटील
मंगळवार, 25 एप्रिल 2017

‘सह्याद्री’त ६० पाणवठ्यांवर दहा मे रोजी होणार; सशुल्क सहभागी होता येणार

‘सह्याद्री’त ६० पाणवठ्यांवर दहा मे रोजी होणार; सशुल्क सहभागी होता येणार

सातारा - हवेतील आल्हाददायक गारवा, नभात चमचमतं चांदणं, शीतल चंद्रप्रकाशात पाणवठ्यावरील सुरक्षित मचानावर बसून वन्यजीवांना जवळून पाहण्याची संधी लवकरच वन्यजीवप्रेमींना मिळणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांत पसरलेल्या सुमारे एक हजार १६५ चौरस किलोमीटर क्षेत्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बौद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी गणना होणार आहे. यावेळी ‘सह्याद्री’मध्ये पहिल्यांदाच वन्यजीवप्रेमींना या गणनेत सशुल्क सहभागी होता येईल. दहा ते ११ मे दरम्यान ‘सह्याद्री’तील ६१ पाणवठ्यांवर ही गणना होईल. 

दिवसभर दाट जंगलातील, आपल्या अधिवासात राहणारे वन्यप्राणी रात्रीच्या अंधारात पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येतात. उन्हाळ्यात जंगलामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असते. केवळ बारमाही पाणवठेच जिवंत असतात. अशा पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची गणना करणे सोपे जाते. त्यातही बौद्ध पौर्णिमेला पुरेसा चंद्रप्रकाश असतो. अशा वातावरणात वन्यप्राण्याला पाहून त्यांची नोंद करणे शक्‍य असते. त्यामुळे हा दिवस प्रगणनेसाठी निवडला जातो. 

वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत ही गणना केली जायची. त्यांच्या मदतीला म्हणून आवाहन करून स्वयंसेवक घेतले जायचे. मात्र, काही वर्षांपूर्वी विचित्र अनुभवांमुळे स्वयंसेवकांचा सहभाग थांबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. तेव्हापासून ‘वन्यजीव’चे कर्मचारीच या गणनेत सहभागी होत. यावेळी प्रथमच स्वयंसेवकांचा सहभाग वाढविण्याचा निर्णय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने घेतला आहे. मात्र, स्वयंसेवकांना त्याकरिता पैसे मोजावे लागतील. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यांवर ६१ ठिकाणी मचान बांधण्यात येत आहेत. मचान हे चारही बाजूने झाडाच्या फांद्यांनी झाकोळलेले असते. त्यामुळे प्रगणकाला प्राणी व्यवस्थित पाहता येतील; मात्र प्राण्यांना प्रगणक दिसणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या व्यवहारात कोणताही हस्तक्षेप होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येते. पाणी पिण्यासाठी आलेल्या वन्यप्राण्यांचे निरीक्षण, त्यांची गणना मचानावर बसून केली जाईल. दहा मे रोजी सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत पाणवठ्यांवर ही गणना केली जाईल. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. विनिता व्यास यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की ‘‘वन्यजीव विभागाचे कर्मचारी, कुंडल (सांगली) येथील वनक्षेत्रपाल प्रशिक्षण केंद्रातील उमेदवार व वन्यजीव विभागाकडे नावनोंदणी करणारे निवडक स्वयंसेवक या गणनेत सहभागी होतील. एक कार्यशाळा घेऊन स्वयंसेवकांना त्यांच्या कामाची रूपरेषा, जबाबदारी, जंगलातील वर्तन, काय करावे व काय करू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.’’ 

निसर्गाविषयी आवड; वन्यप्राण्यांविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा असलेल्या नागरिकांना मानवी हस्तक्षेप टाळून निसर्गाच्याजवळ जाण्याची चांगली संधी निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- डॉ. विनिता व्यास, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

Web Title: volunteer for wild animal counting