मतदारपत्रिकांचे घरोघरी वाटप करणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

सातारा - ग्रामीण भागातील प्रत्येक मतदारांपर्यंत मतदारपत्रिका (व्होटर स्लिप) पोचविण्याचे नियोजन झाले आहे. जिल्ह्यातील 19 लाख 23 हजार 449 मतदारांना केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून (बीएलओ) ता. 18 ते 20 फेब्रुवारी या तीन दिवसांत या स्लिप पोच केल्या जाणार आहेत. अगदी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्लिप देण्याचे निवडणूक विभागाने नियोजन केले आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. 21) जिल्ह्यातील दोन हजार 788 केंद्रांवर मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभारण्याचे काम निवडणूक विभागाने सुरू केले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे मतदारपत्रिका प्रत्येकांपर्यंत पोचविणे. हे काम शनिवारपासून (ता. 18) सोमवारपर्यंत तीन दिवसांत केले जाणार आहे. त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात आले आहे. या स्लिप वाटण्यासाठी तीन दिवसांत तब्बल दोन हजार 582 कर्मचारी राबतील. अगदी मतदारांच्या दारात आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या स्लिप देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. या स्लिप जिल्ह्यातील 19 लाख 23 हजार 449 मतदारांपर्यंत पोचविल्या जातील. रविवारपर्यंत (ता. 19) हे काम पूर्ण करण्याचा निवडणूक विभागाचा मानस आहे. त्यासाठी "बीएलओं'च्या माध्यमातून ही यंत्रणा राबणार आहे. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यासह शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल. कोणत्याही परिस्थितीत व्होटर स्लिपपासून मतदार वंचित राहणार नाही, याची काळजी यंत्रणा घेत आहे. 

मतदारांना मतदान केंद्रात गेल्यावर आपला मतदार क्रमांक व इतर बाबी तपासण्याची गरज पडू नये म्हणून या मतदार पत्रिका प्रत्येक मतदारांपर्यंत पोचविण्याच्या प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनही स्लिप पोच केल्या जातील. 

- भरत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी, सातारा

Web Title: voter slip allocation