सोलापूर महापालिकेत भाजपने इतिहास रचला !

सोलापूर महापालिकेत भाजपने इतिहास रचला !

जिल्हा परिषदेत मुसंडी; राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या जागात घट

सोलापूर- सोलापूरच्या मतदारांनी महापालिकेमध्ये पुलोदचा प्रयोग वगळता तब्बल 33 वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या कॉंग्रेसला अक्षरशः धोबीपछाड देत भाजपच्या पारड्यात 102 पैकी तब्बल 49 जागांचे दान देत एकप्रकारे इतिहासच रचला.

महापालिकेच्या रिंगणात प्रथमच उतरलेल्या एमआयएमने नऊ जागा जिंकत जबरदस्त एंट्री केली. शिवसेनेनेही आघाडी घेत 21 जागा मिळविल्या. कॉंग्रेसला मात्र 14 जागांवर समाधान मानावे लागले. मुंबई महापालिकेमध्ये युती होते की नाही यावर सोलापूरचीही दिशा ठरणार आहे. तर जिल्हा परिषदेत गेल्यावेळी अस्तित्वहीन असलेल्या भाजपने तब्बल 14 जागांवर यश मिळविले. शिवसेनेनेही पाच जागा जिंकत खाते उघडून जबरदस्त मुसंडी मारली आहे.

महापालिकेत निर्विवाद वर्चस्व असलेल्या सुशीलकुमार शिंदे व त्यांची कन्या शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची व अस्तित्वाची होती. परंतु या निवडणुकीत कॉंग्रेसची झालेली प्रचंड पिछेहाट नामुष्कीची ठरली. त्यांच्यासाठीही हा निकाल "सेटबॅक' ठरला. कॉंग्रेस पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापून त्यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला. सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने विकासाच्या दृष्टीने काहीच केले नसल्याचा आरोप होत होता. उजनी धरण भरलेले असतानाही शहरास तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने संतापजनक प्रतिक्रिया होत्या. कॉंग्रेसकडून प्रचारात विकासाच्या दृष्टीने कोणतेही ठोस आश्‍वासन नसल्याने त्यांच्यावर पराभवाचा डोंगरच कोसळला. या निकालाने पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख तसेच खासदार ऍड. शरद बनसोडे यांची उंची वाढली आहे. यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना "फिल्डींग' लावावी लागली आहे. सोलापूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश, केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार, पालिका ते पार्लमेंट ही घोषणा व मतदारांना दाखविलेली विकासाची हमी यामुळे भाजपला यश मिळाले आहे.

52चा मॅजिक फिगर गाठण्यासाठी व महापालिकेत सत्तेवर येण्यासाठी भाजपला केवळ तीन नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. यासाठी बहुजन समाजवादी पक्षाने विकासाच्या मुद्‌द्‌यावर सोबत करण्याची तयारी दर्शविली आहे. तर उत्तर सोलापूर तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने एकत्र येऊन आघाडी केली होती. तो पॅटर्न महापालिकेत लागू होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

जिल्हा परिषद
सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. मागील निवडणुकीत त्यांच्या 34 जागा निवडून आल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तीच गत कॉंग्रेसचीही झाली आहे. मागील निवडणुकीत कॉंग्रेसकडे 18 जागा होत्या. या वेळी मात्र त्यांना सात जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. सत्तेसाठी राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना एकत्र येतील की स्थानिक आघाड्या (16 जागा) व भाजप (14 जागा) हे अपक्षांच्या मदतीने सत्तारुढ होतील, याची उत्सुकता राहील. जिल्ह्यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्र आल्यास राष्ट्रवादीच्या विरोधकांना सत्ता स्थापन करण्यात यश मिळण्याची शक्‍यता आहे.

या निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांची स्थिती कमकुवत झाली आहे. करमाळ्यात शिवसेनेचे आमदार नारायण पाटील, माळशिरसमध्ये राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस, माढ्यात आमदार बबनराव शिंदे, बार्शीत आमदार दिलीप सोपल, सांगोल्यात शेकापचे आमदार गणपतराव देशमुख, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात भाजपचे सुभाष देशमुख यांची स्थिती भक्कम झाली आहे. कॉंग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची स्थिती कमकुवत झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या 11 पैकी आठ जागा जिंकून आपली प्रतिष्ठा कायम राखली आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसमध्ये असलेले बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यंदा भाजपमध्ये गेल्याने कॉंग्रेसच्या जागा कमी झाल्या आहेत. याठिकाणी असलेल्या उत्तम जानकर व श्री. राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याठिकाणी भाजपला फायदा झाला आहे. मोहिते-पाटील कुटंबातील रिंगणात असलेल्या सहापैकी चारजणांच्या गळ्यात विजयश्रीने माळ घातली आहे. आमदार शिंदे यांच्या कुटुंबातील रिंगणात असलेल्या चारही उमेदवारांनी विजय मिळविला आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज, माजी आमदार धनाजी साठे यांचे चिरंजीव दादासाहेब यांना पराभव पत्करावा लागला.

मातब्बरांचा पराभव
यंदाच्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसच्या विद्यमान महापौर सुशीला आबुटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमहापौर प्रवीण डोंगरे, आरिफ शेख, मनोहर सपाटे, नलिनी चंदेले, अरुणा वाकसे, संजय हेमगड्डी (विद्यमान पक्षनेता) हे माजी महापौर तर दिलीप कोल्हे व हारुन सय्यद या माजी उपमहापौरांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला आहे.

महापालिकेतील पक्षीय बलाबल (कंसात आधीचे बलाबल)
भाजप - 49 (23)
शिवसेना - 21 (9)
कॉंग्रेस - 14 (43)
एमआयएम - 9 (0)
राष्ट्रवादी - 4 (16)
बसप - 4 (3)
-माकप - 1 (3)
---------------------
एकूण 102

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल (कंसात गतवेळची स्थिती)
राष्ट्रवादी -23 (34)
भाजप - 14 (0)
कॉंग्रेस - 7 (18)
शिवसेना - 5 (0)
स्थानिक आघाड्या - 16 (16)
अपक्ष 3 (0)

एकूण-68

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com