नगरसेवकपदाच्या 225 उमेदवारांचे भवितव्य सील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

इचलकरंजी - नगरपालिका निवडणुकीसाठी 274 मतदान केंद्रावर आज चुरशीने मतदान झाले. काही मतदान केंद्रावर उमेदवार व त्यांचे समर्थकांत जोरदार वादावादीचे प्रसंग घडले. हे प्रसंग वगळता शहरातील मतदान शांततेत पार पडले. नगराध्यक्षांचे सात आणि नगरसेवक पदाच्या 225 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील झाले.

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यात येणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली होती. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त होता. उद्या (ता. 28) सकाळी 10 वाजता राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये मतमोजणी होणार आहे.

इचलकरंजी - नगरपालिका निवडणुकीसाठी 274 मतदान केंद्रावर आज चुरशीने मतदान झाले. काही मतदान केंद्रावर उमेदवार व त्यांचे समर्थकांत जोरदार वादावादीचे प्रसंग घडले. हे प्रसंग वगळता शहरातील मतदान शांततेत पार पडले. नगराध्यक्षांचे सात आणि नगरसेवक पदाच्या 225 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील झाले.

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यात येणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली होती. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त होता. उद्या (ता. 28) सकाळी 10 वाजता राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये मतमोजणी होणार आहे.

सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. येथे 2 लाख 19 हजार 866 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 14 हजार 588 पुरुष तर 1 लाख 5 हजार 225 स्त्रीया आहेत. थंडी असतानाही सकाळी दोन तासात 9.50 टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासात 20 हजार 881 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढत गेली. सकाळी साडेअकरा वाजता 51 हजार 948 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 23.63 होती. दुपारी दीड वाजता 40.75 टक्के व्यक्तींनी म्हणजेच 89 हजार 586 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी दुपारी साडेतीन वाजता 58.44 वर पोचली. दुपारपर्यंत 1 लाख 28 हजार 498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारीही केंद्रावर रांगा बघावयास मिळाल्या. काही भागामध्ये सकाळी गर्दी कमी होती. तीननंतरही काही भागात गटागटाने मतदान केंद्रावर लोक येऊ लागले. रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पहावयास मिळाल्या. आयोगाने ठरवून दिलेल्या वेळेत मतदान केंद्रात प्रवेश केलेल्यांना मतदान करण्यास देण्यात आले.

गावभाग, अनुबाई कन्या विद्यामंदिर, तांबेमाळ, शहापूर आदी परिसरात उमेदवार व त्यांच्या समर्थकांत वादावादीचे प्रसंग घडले; मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आल्याने त्या ठिकाणी पोलिसांनी येऊन जमावाला पांगविले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्याला नेमून दिलेल्या विविध भागात फिरती केली. तसेच त्याची माहिती मुख्य निवडणूक केंद्राकडे दिली. आयोगाकडेही वादावादीसंदर्भात कोणतीही तक्रार आली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे हे राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये दिवसभर उपस्थित होते. केंद्रावरून येणारी माहिती राज्य निवडणूक आयोगाला वेळोवेळी पाठविण्यात येत होती. त्यांना सहकार्य करण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत रसाळ व इतर अधिकारी होते. अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, पोलिस उपाधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात बंदोबस्त होता.
भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऍड. अलका स्वामी यांनी अरुण विद्यामंदिर येथे मतदानाचा हक्क बजावला. कॉंग्रेसचे उमेदवार रवी रजपूते यांनी भाग्यश्री कॉलनी जवळ असणाऱ्या शाळा क्रं. 12 मध्ये मतदान केले. तसेच शिवसेनेचे उमेदवार दशरथ माने यांनीही मतदानाचा हक्क बजावला. आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, अशोक स्वामी, हिंदूराव शेळके आदी प्रमुख नेत्यांनी विविध केंद्रावर जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे पोलिस बंदोबस्तात एकत्र जमा करण्यात आली. अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा असल्याने मतदान यंत्रे केंद्रावरून घेऊन येण्यास विलंब लागत होता.

नगराध्यक्ष निकाल शेवटी
राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये उद्या (ता. 28) सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरवात होणार आहे. 13 टेबलावर मतमोजणी होईल. एकावेळी तीन प्रभागातील मतमोजणी करण्यात येणार आहे. याचवेळी नगराध्यक्षपदाचीही मतमोजणी करण्यात येईल. नगराध्यक्ष पदाचा निकाल हा सर्व प्रभागातील मतमोजणी झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.

दुपारी 12 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट
शहरामध्ये 31 प्रभाग आहेत. 62 उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षांची मतमोजणी करत असताना या प्रभागातील उमेदवारांचीही मतमोजणी करण्यात येणार आहे. तीन-तीन प्रभागातील निकाल जाहीर होईल; मात्र नगराध्यक्षपदाच्या निकालाचे चित्र दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Voting for Corporation election completed