मतदान यंत्रे पडली "रस्त्यावर'!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

आवाहनाचे झाले काय?
वापरलेली मतदान यंत्रे केडगाव गोदामात स्थलांतरण करताना राजकीय पक्ष, निवडणुकीतील उमेदवार, प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. परंतु, यापैकी कुणीच यावेळी उपस्थित नसल्याचे समजते. प्रशासनाने स्थानांतरणावेळी पोलिस बंदोबस्त असेल असेही सांगितले होते. मात्र, तशी सुरक्षाही दिसली नाही. प्रशासनाचा गलथान कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाला.

नगर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडू येथून नवीन मतदार यंत्रे येणार आहेत. त्या यंत्रांना जागा देण्यासाठी एमआयडीसीतील वखार महामंडळ असणारी लोकसभा निवडणुकीत वापरलेली यंत्रे केडगाव गोदामात स्थलांतरीत करण्याचे काम आज सुरू होते. मात्र, ही यंत्रे हलविताना आवश्‍यक ती खबरदारी न बाळगल्याने प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा उघड झाला. चारचाकी वाहनातून यंत्राची वाहतूक सुरू असताना वाहन गतिरोधकावर आदळल्याने ही यंत्रे रस्त्यावर पडली. ही बाब लक्षात आल्यानंतर वाहक- चालकाने ती यंत्रे उचलली.

नगर व शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदान यंत्रे वखार महामंडळाच्या एमआयडीसी येथील गोदामात ठेवण्यात आली होती. ही यंत्रे मतदानानंतर 45 दिवस बंदोबस्तात ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवीन मतदार यंत्रे येणार आहेत. या नवीन यंत्रांची तपासणी तसेच त्या अनुषंगाने असलेल्या इतर बाबींसाठी पुरेशी व सुरक्षित जागा आवश्‍यक असते. शहरात एमआयडीसी गोदामातच अशी जागा असल्याने प्रशासनाने जुनी मतदान यंत्रे केडगाव गोदामात हलविण्याचे ठरविले. ही यंत्रे पोलिस बंदोबस्तात स्थानांतरित करण्यात येतील व ज्या वाहनातून त्यांची वाहतूक होईल, त्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. स्थलांतर प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आज प्रत्यक्षात वाहतूक सुरू असताना ही यंत्रे कल्याण बायपास रस्त्यावर पडली. यंत्रे नेणारे चारचाकी वाहन गतिरोधकावर आदळल्याने दोन यंत्रे रस्त्यावर पडली. चालक- वाहकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ही यंत्रे उचलली. हा प्रकार पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी आश्‍चर्य व्यक्त केले. स्थानांतरणावेळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचेही काही नागरिकांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting Machine Road