Vidhan Sabha 2019 : केवळ नऊ रुपये संपत्ती; शरद पवारांकडून घेतले कर्ज, आता अक्कलकोटमध्ये उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

केवळ नऊ रुपयांची संपत्ती असलेले चडचण तालुक्‍यातील रहिवाशी व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्याकडून 99 हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. नुकत्याच झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी 1830 मते मिळवली आहेत.

ःसोलापूर : केवळ नऊ रुपयांची संपत्ती असलेले चडचण तालुक्‍यातील रहिवाशी व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्याकडून 99 हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. नुकत्याच झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी 1830 मते मिळवली आहेत. 

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी हिंदुस्थान जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाततर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी फक्त नऊ रुपये हातात असल्याचा उल्लेख केला आहे. त्याच वेळी त्यांनी शरद पवार यांच्याकडून 99 हजार रुपयांचे कर्ज हातउसने घेतल्याचे म्हटले आहे. लोकसभेच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 45 हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे नमूद केले होते. 

निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेले पॅनकार्ड त्यांनी काढले आहे. व्यंकटेश्‍वर महास्वामी ऊर्फ दीपक गंगाराम कटकधोंड, असे त्यांचे नाव आहे. महाराष्ट्रातील जत विधानसभा मतदारसंघातील यादीत त्यांचे नाव असल्याचा उल्लेख आहे. 31 वर्षीय व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी धारवाड विद्यापीठातून बीकॉमची पदवी मिळवली आहे. निवडणूक लढविण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची माहिती त्यांनी घेतली आहे. या महास्वामींच्या नावावर कोणत्याही प्रकारची जंगम अथवा स्थावर मालमत्ता नाही, तसेच त्यांच्यावर कुणीही अवलंबून नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

शरद पवार नेमके कोण ?
शरद पवार यांच्याकडून 99 हजार रुपये हातउसणे कर्ज घेतल्याचे महास्वामी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र कर्ज देणारे शरद पवार म्हणजे नेमके कोण हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता,  शरद पवार हे त्यांना कर्ज देणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vyankateswar mahaswami contest akkalkot vidhansabha election