वडाळीच्या निकिता काटेची भालाफेक स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड 

sanjay-kate
sanjay-kate

श्रीगोंदे - आई-वडीलांची आर्थिक स्थिती नसताना, ररायला डोक्यावर आधार म्हणून पत्र्याचे शेड, दीड एकर जिरायती शेती, आई मजूरी करते तर वडील वाहन चालक आहेत. या प्रतिकुल परिस्थितीत न डगमगता जिद्दीच्या जोरावर निकीताने भालाफेक स्पर्धेत कठोर परिश्रम घेतले. शहरातील मुलींना मागे टाकत नागपुर येथील स्पर्धेत मिळविलेल्या यशाच्या जीवावर तीची राष्ट्रीय संघात स्थान निवड झाली आहे. 

वडाळी ता. श्रीगोंदे येथील निकीता भास्कर काटे या वडाळी माध्यमिक विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने गावासह तालुक्याचे नाव भालाफेक स्पर्धेत राज्यात नेले. क्रिडाशिक्षक बापुराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या निकीताने प्रतिकुल परिस्थितीत मिळविलेले हे यश नजरेत भरणारे आहे. 

वडाळी येथे तीच्या वडीलांची दीड एकर जमीन आहे. मात्र पाणी नसल्याने पीक पावसावर अवलंबून असते. निकीताला राहण्यासाठी चांगले घर सुध्दा नाही. दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये भास्कर काटे यांच्या कुटुंबाचा प्रपंच आहे. निकीता व तीचा धाकटा भाऊ विनीत हे दोघेही खेळाडू आहेत. मात्र त्यांच्यासाठी वेगळ्या सुविधा, प्रशिक्षण देण्याची आर्थिक परिस्थिती त्यांची नाही. निकीताला भालाफेक खेळाची आवड असल्याने तीच्या आई-वडीलांनी दुसऱ्याच्या शेतात कष्ट केले मात्र तीला स्पर्धेला पाठवले. यापुर्वी विभागीय पातळीवर यश मिळवित तीने अपेक्षा उंचावल्या होत्या. दोन दिवसापुर्वी तीने नागपुर येथे झालेल्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविल्याने राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.  तीच्या विरुध्द खेळणाऱ्या पुण्यासह इतर शहरातील क्लबच्या खेळाडूंना सगळ्या सुविधा होत्या मात्र निकीताने जिद्दीच्या जोरावर यश मिळविले. तालुक्यातील ती राष्ट्रीय पातळीवर खेळणारी पहिली खेळाडू ठरणार आहे.

निकीताच्या शाळेता चांगले मैदान नाही. स्पर्धेत अॅल्युनियमचे भाले असतात येथील मैदानात ते टिक नसल्याने लाकडी भाल्यावर ती सराव करते. २८ मीटरपर्यंत ती भाला फेकते मात्र अॅल्यूनियम व लाकडी यातील फरकाचा फटका तीला बसला. विद्यालयाचे अध्यक्ष घनशाम शेलार यांनी निकीताची आर्थिक स्थिती नसली तरी तीची जिद्द पाहून तीचा सगळा आर्थिक खर्चाचा भार उचलत आहेत. 

आई-वडीलांना सुखात पाह्यचे आहे.
डोळे पुसत निकीता सांगत होती, आमची घरची परिस्थिती बेताची असली तरी आई-वडील व शिक्षकांच्या पाठबळावर भालफेकीचा सराव करीत असते. आईला दुसऱ्याच्या शेतात मजूरी करायला लागू नये अशी माझी इच्छा आहे. मी या खेळात देशासाठी खेळायचे असून आई व वडीलांचे स्वप्न पुर्ण करणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com