दाट जंगलात लक्ष वेधतो ‘वाघझरा’

दाट जंगलात लक्ष वेधतो ‘वाघझरा’

कोल्हापूर -  आंबा गावापासून विशाळगडला जाणाऱ्या रस्त्यावर अवघ्या दोन-तीन किलोमीटर अंतरावर दाट झाडीचे जंगल सुरू होते. वळणावळणाचा डांबरी रस्ता त्या झाडीतूनच विशाळगडाकडे जाऊ लागतो. जसजसे पुढे जाऊ तसतशी झाडी आणखी गर्द आणि त्या झाडीमुळे रस्त्यावरची सावलीही गडद होऊ लागते. उन्हाची तिरीपही झाडांच्या फांद्यावरच येऊन थांबते. असंच काही अंतर पुढे गेले, की दाट झाडीचाही एक वेगळा गंध जाणवू लागतो.

वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज अगदी सुरात ऐकायला येऊ लागतो आणि एका वळणावर उजव्या बाजूला ‘वाघझरा’ आपले लक्ष वेधून घेतो. आंबा-विशाळगड परिसरात आंबा गावातही आणि वरती विशाळगडावरही पर्यटकांची गर्दी असते; पण मध्येच जंगलात असलेल्या वाघझरा या पाणवठ्याच्या जागी पर्यटकांची गाडी हमखास थांबते. वाघझऱ्याला वाघाचे पाणीही म्हणतात. हा वाघझरा आता जेवणाच्या पंगती बसण्याचे ठिकाण झाला आहे.

‘रंगीत’ पंगतीचेही ते ठिकाण आहे; पण क्षणभर ही दुरवस्था बाजूला ठेवून, या वाघझऱ्याचा परिसर पाहिला, की दाट जंगलात नैसर्गिक पाणवठे कसे असतात?, ते वन्यप्राण्याची तहान कशी भागवतात ? असे पाणवठे जंगलात आवश्‍यक का असतात ? याचे वास्तव दर्शन घडते. किंबहुना अशी ठिकाणेच जंगलाचे, वन्य प्राण्यांचे बळ असते आणि वाघझरा येथे रस्त्यालगत अवघ्या ५० फुटावर पाहायला मिळते. 

जंगलाचे प्रतिबिंब, पक्ष्यांचा आवाज
इथली शांतताही हळूहळू भीतिदायक वाटू लागते. पण पर्यटन म्हणजे हॉटेल, चमचमीत पदार्थ, दंगा मस्ती, सेल्फी असे मानणाऱ्यांना वाघझऱ्याचे नैसर्गिक महत्त्व कळणारच नाही. त्यामुळे ज्याला जंगलातला खळाळणारा ओहोळ, नैसर्गिक पाण्याचा साठा, त्यात जंगलाचे पडणारे प्रतिबिंब पाहत, पशु-पक्ष्यांच्या अस्तित्वाचा आवाज ऐकायचा आहे त्यांनी वाघझरा पाहण्याचीच गरज आहे.
 

या परिसरातले पर्यटन म्हणजे आंबा घाट, पावनखिंड, पांढरपाणी, विशाळगड जरूर आहे. पण या सर्वांच्या मध्ये दाट जंगलात दडलेले वाघझरा हे वेगळ्या अर्थाने पर्यटनस्थळ आहे. 
या वाघझऱ्यावर आता लोकांचा कायम गजबजाट असतो. तेथेच दाट सावलीत पंगतीचा फेर रंगतो. पण वाघझऱ्यांचा परिसर इथली गर्दी कलबलाट कमी झाला की खुलू लागतो. 

वाघझरा हे नैसर्गिक पाणवठ्याचे ठिकाण. जंगलातून उतारावरून येणारा एक पाण्याचा ओहोळ या ठिकाणी खळखळत येतो. पुर्वी तिथल्याच खाचखळग्यात हे पाणी साठायचे बाकीचे पाणी पुढे वाहून जायचे. आणि रात्री या रस्त्यावरची वर्दळ कमी झाली की बिबट्या, गव्यापासून प्रत्येक वन्यप्राण्याचे ‘पाय’ तहान भागवण्याठी या वाघझऱ्याला लागायचे. 

‘पाय’ हा शब्द अशा अर्थाने की जो वन्यप्राणी या पाणवठ्यावर यायचा तो पाणवठ्यावरच्या चिखलात आपल्या पावलाच्या खुणा मागे ठेवून जायचा. आता या वाघझऱ्याच्या परिसरात वन विभागाने खोदाई करून बऱ्यापैकी पाण्याचा साठा केला आहे.

पाणवठ्याच्या एका बाजुला पर्यटकांच्या अस्तित्वाच्या बाटली, पत्रावळी, खाऊची पाकिटे, प्लास्टीक ग्लास, गुटख्याची पाकिटे या खूणा तर पाणवठ्याच्या दुसऱ्या बाजुस आजही वन्यप्राण्यांच्या पायाच्या खुणा दिसतात. या पाणवठ्यापासून पुढे दाट जंगल आहे आणि एवढ्या जंगलातही वाघझऱ्याचा पाणवठा वन्य प्राण्यांचा आधार आहे. पाणवठा शांत झाल्यावर आपणही अगदी शांत या परिसरात बसून राहिलो तर जंगलातले विविध आवाज इथे कानावर पडतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com