गोवेदिगरच्या जवानाकडून जवानाचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

वाई - दारूच्या नशेत मित्रांमध्ये झालेल्या झटापटीत गोवेदिगर (ता. वाई) येथील जवानाचा खून झाला. रविवारी (ता. 4) रात्री धोम जलाशयालगत हा प्रकार घडला. गणेश बाळू पिसाळ (वय 26) असे मृताचे नाव असून, तो पठाणकोट (पंजाब) येथे लष्करात कार्यरत आहे. या प्रकरणी पोलिसांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) जवान सागर विष्णू पिसाळ (वय 30, रा. गोवेदिगर) व सुनील पिलोबा गाढवे (वय 36, रा. 227, गंगापुरी, वाई) या दोघांना अटक केली. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. संशयित सुनील गाढवे हा मृत गणेश पिसाळचा मावस भाऊ, तर सागर पिसाळ त्याच्या भावकीतील आहे.

पोलिसांनी सांगितले, की गणेश पिसाळ, सागर पिसाळ, सुनील गाढवे व अन्य असे सात मित्र रविवारी वेलंग येथे यात्रेसाठी गेले होते. सायंकाळी सव्वासहा वाजता सर्व जण धोम जलाशयालगतच्या पटांगणात दारू पित बसले. यावेळी गणेशने "तू तुझ्या बहिणीस का मारलेस,' असा जाब अमोल साहेबराव पिसाळ यास विचारला. त्यावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. वाद विकोपाला जाऊ नये म्हणून सागरने "तुम्ही चौघे निघून जा, मी त्याला शांत करतो,' असे इतर मित्रांना सांगितले. त्यावर गणेशने अमोलला का जाऊ दिले, या कारणावरून सागरला धक्काबुक्की केली.

यावेळी गणेशने सुनीलचा चावा घेतला. त्यानंतर झालेल्या झटापटीत सागर पिसाळ व सुनील गाढवे यांनी गणेशला जोरात आवळून धरले. दरम्यान, गणेशची हालचाल बंद झाल्याने त्यास तातडीने वाईच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले; परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. गणेशच्या अंगावर काही ठिकाणी खरचटल्याचे व डोक्‍याला जखम झाल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलिस निरीक्षक बबन येडगे, उपनिरीक्षक शिरीष शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात व घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. सखोल चौकशीनंतर सागर पिसाळ व सुनील गाढवे या दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. कृष्णदेव तुकाराम पिसाळ यांनी याबाबतची फिर्याद पोलिसांत दिली असून, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ तपास करीत आहेत.

आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
अटकेतील दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याचा हेतू व अन्य पुरावे गोळा करण्यासाठी संशयितांना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील आर. पी. सोनावणे यांनी केली. त्यावर न्यायालयाने दोघांना आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Web Title: wai news satara news jawan murder