वाहतूक आराखडा कागदावरच

भद्रेश भाटे
गुरुवार, 29 मार्च 2018

शहरातील वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाईल. शहरात घोटवडेकर हॉस्पिटल व धुंडीविनायक मंदिराजवळ कृष्णा नदीवर पर्यायी पूल बांधण्यासाठी आवश्‍यक निधी व प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव दिला आहे. या पुलांमुळे वाहतुकीची समस्या दूर होईल. 
- प्रसाद काटकर, मुख्याधिकारी, वाई पालिका

वाई - वाहनांची वाढती संख्या, रस्त्यावरील अतिक्रमणे व बेशिस्त पार्किंगमुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, पालिका व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा आराखडा कागदावर राहिला आहे. त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे. 

दक्षिण काशी व तीर्थक्षेत्र वाई शहरात कृष्णाकाठावर महागणपतीचे प्रसिध्द मंदिर आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. परिसरातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठीही अनेक पर्यटक येतात.

तालुक्‍याच्या ग्रामीण भागातून खरेदीसाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांचाही शहरातील वाहतुकीवर ताण येतो. सर्वच बाजूने वाहने येत असल्याने महागणपती पुलावर वाहतुकीची कोंडी नित्याची बनली आहे. शहरात किसन वीर चौक, चित्रा टॉकीज चौक, ग्रामीण रुग्णालय, विष्णू मंदिर चौक, भाजी मंडई, बस स्थानक परिसरात प्रामख्याने वाहतुकीची प्रचंड समस्या भेडसावते.

वाहनधारकांबरोबरच पायी चालत व सायकलवरून जाणाऱ्या नागरिकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. अरुंद रस्ते, त्यातच वाहनतळाची सोय नसल्याने बहुतेक वाहने रस्त्यावर उभी असतात. अनेक ठिकाणी रस्त्यावर दुकानदारांच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडचण होताना दिसते. त्यावर उपाय म्हणून शहरातील वाहतुकीच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये काही ठिकाणी एकेरी वाहतूक, प्रवेश बंद, सम-विषम तारखांना पार्किंग, जड वाहनांना बंधन अशा नियमांचा समावेश आहे. अनेकदा प्रायोगिक तत्त्वावर या आराखड्याची अंमलबजावणी झाली. परंतु, त्यानंतर हा आराखडा कागदावरच राहिला आहे.

केवळ काही नो-पार्किंग व प्रवेश बंदचे फलक आढळतात. मात्र, शिस्त कोणीच पाळत नाही. प्रत्येक वेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला की फक्त चर्चा होते. पुढाकार कोणीच घेत नाही. वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पालिका व पोलिस प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: wai satara news transport scheme on paper