नव्या नोटांसाठी करावी लागणार प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

सांगली - केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून काल मध्यरात्रीपासून बाद केल्या. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. नव्या नोटा अद्याप चलनात आल्या नसून बॅंक व्यवस्थेवर ताण पडू लागला आहे. कालच्या सुटीनंतर बॅंका आज सकाळी खुल्या झाल्या, पण तासा-दोन तासांत सारी कॅश संपल्याने नागरिकांना परतावे लागले. त्यामुळे "कुणी सुट्टे देता का सुट्टे..' अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. सर्व सामान्यांना खर्चाला सुट्टे पैसे नसल्याने हाल सुरू असून बहुतांश व्यवहार ठप्प आहेत.

सांगली - केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून काल मध्यरात्रीपासून बाद केल्या. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. नव्या नोटा अद्याप चलनात आल्या नसून बॅंक व्यवस्थेवर ताण पडू लागला आहे. कालच्या सुटीनंतर बॅंका आज सकाळी खुल्या झाल्या, पण तासा-दोन तासांत सारी कॅश संपल्याने नागरिकांना परतावे लागले. त्यामुळे "कुणी सुट्टे देता का सुट्टे..' अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. सर्व सामान्यांना खर्चाला सुट्टे पैसे नसल्याने हाल सुरू असून बहुतांश व्यवहार ठप्प आहेत.

पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बंद केल्याचा फतवा आल्यानंतर बॅंकांनी काल बंद ठेवून सारा निपटारा केला. आज सकाळी दहा वाजता बॅंका खुल्या झाल्यानंतर नागरिकांची अक्षरशः रीघ लागली होती. जुन्या पाचशे-हजारच्या नोटा जमा करून खर्चासाठी पैसे काढले जात आहेत. परंतु प्रत्येक खातेदाराला केवळ चार हजार रुपयेच दिले गेले. मात्र बॅंकेच्या शाखेत पैशांचा अपुरा पुरवठा असल्याने बहुतांश लोकांना नाराजीने परतावे लागेल. तासा-दोन तासांत बॅंकेतील कॅश संपल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या. शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाल्याने अखेर बॅंक प्रशासनाने दहा, वीस, पन्नास रुपयांच्या नोटा नागरिकांना दिल्या. दुपारनंतर बॅंकेतील कॅश संपल्याने केवळ भरणा करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती.

दुसऱ्या बाजूला एटीएम आजही बंद असल्याने सर्वसामान्य लोकांचे हाल सुरू आहेत. भाजीपालासह जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी सुट्ट्या पैशांचे वांदे निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी व्यवहार ठप्प आहेत. बहुतांश ठिकाणी पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे फलक लावण्यात आले आहेत. परगावाहून आलेल्या नागरिकांची मोठी गोची झाली आहे. खर्चासाठी पैसे न उरल्याने बॅंकांच्या पायऱ्या झिजवल्या जात आहेत. पोस्टातही पैसे भरणा करण्यासाठी रांग लागली होती.

नव्या नोटा रिझर्व्ह बॅंकेच्या "मुद्रा पेटीका'त जमा झाल्या असून अद्याप चलनात आलेल्या नाहीत. जरी दोन हजारांची नोट नागरिकांना मिळाली, तर पुन्हा सुट्ट्यांचे वांदे होणारच आहेत. एटीएमही दोन दिवसानंतर सुरू होणार असल्याची शक्‍यता वर्तवल्याने अनेकांचे हाल सुरू आहेत. अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या ठिकाणीही पाचशे-हजारचा नोटा स्वीकारल्या जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा रोष व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी अत्यावश्‍यक सेवेच्या ठिकाणी पैसे घेतले जातील, असे जाहीर केले आहे. परंतु काही खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोठी त्रेधा उडाली आहे.

""नागरिकांनी संयमतेने राहावे. सर्वांचे पैसे बॅंकेत स्वीकारले जाणार आहेत. अत्यावश्‍यक सेवेतही स्वीकारले जातील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ऑनलाइन व्यवहार अधिक करावेत.''
- शेखर गायकवाड जिल्हाधिकारी

""सांगली रिझर्व्ह बॅंकेची मुद्रा पेटीका आहे. त्याठिकाणी नव्या नोटा दाखल झाल्या आहेत. परंतु त्याचे वाटप करण्याचे निर्देश अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे बॅंकेत आज खातेदारांना चार हजार रुपये देण्यात आले आहेत. शंभरच्या नोटांचा तुटवडा झाल्यानंतर सुट्टे पैसे देण्यात आले आहेत. दोन दिवसांत सारे व्यवहार सुरळीत होतील. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सर्व बॅंकांमध्ये जुन्या पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. दोन दिवसांत एटीएमचीही व्यवस्थाही सुरळीतपणे सुरू होईल.''
- रवींद्र पुजारी, जिल्हा प्रबंधक अग्रणी बॅंकेचे (बॅंक ऑफ इंडिया)

""बॅंकेत पैसे भरणा करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यात कायदा सुव्यवस्थेला धोका होऊ नये यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाजारपेठा, बॅंकेचा परिसरात साध्या वेशातील पोलिस तैनात आहेत. तसेच बॅंकेत व्यवस्थापकांची बैठक घेऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सूचना दिल्या आहेत. महिला गस्ती पथकही तैनात आहे.''
- डॉ. दीपाली काळे, पोलिस उपाधीक्षक, सांगली.

दृष्टिक्षेपात....
* पेट्रोल पंपावर जुन्या नोटा अद्याप स्वीकारल्या जातात.
* किराणा, भाजीपाला यासह जीवनावश्‍यक वस्तू खरेदी अत्यल्प
* उधारीवर बहुतांश व्यवहार असल्याने बाजारपेठा ठप्प
* सोने-चांदी दरात तेजी; खरेदी कमी
* शासकीय देयकांसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याचे शासनाचे आदेश
* खासगी हॉस्पिटलमध्ये जुन्या नोटातून व्यवहार बंद

Web Title: wait for new notes