जिल्ह्यात देहदान करण्यासाठीसुद्धा आता ‘वेटिंग’

जिल्ह्यात देहदान करण्यासाठीसुद्धा आता ‘वेटिंग’

९०० जणांचे अर्ज ः शिक्षक, नोकरदार, राजकारणातील व्यक्तींचा समावेश

कोल्हापूर - एक काळ असा होता की देहदान, नेत्रदान आणि रक्तदान करा म्हणून जनजागृतीसाठी शिबिरे, मेळावे घ्यावे लागत होते. आज नेमकी उलटी स्थिती असून नेत्रदान आणि रक्तदानाबरोबरच देहदान करण्यासाठीही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देह स्वीकारणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातही आता ‘वेटिंग’ आहे. 

शंभर, दोनशे नव्हे तर तब्बल ९०० हून अधिक जणांची नोंदणी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये देहदानासाठी झाली आहे. यामध्ये निवृत्त शिक्षक, नोकरदार, राजकारणातील व्यक्तींचा समावेश आहे. 

रक्तदान श्रेष्ठ दान, अशी जाहिरात झाली आणि रक्तदानासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. ही चळवळ यशस्वी होत असतानाच देहदानाचीही चळवळ अधिक घट्ट झाली. मेडिकल कॉलेजमध्ये क्षमतेपेक्षा अधिक देह दानासाठी येत आहेत. यासाठी आता नोंदणी आवश्‍यक केली आहे. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूरसह इस्लामपूर, निपाणी, गोवा आणि कोकण आदी भागातून डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये देहदान केले जात आहे. २४ तास सेवा दिली जात असल्यामुळे येथे प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. देहदान करण्यासाठी स्वतः त्या व्यक्तीने अर्ज सादर करावा लागतो. 

त्या अर्जावर संबंधित सर्व वारसदारांच्या सह्या आणि संमतीपत्र लागते. त्यानंतरच नोंदणी करून घेतली जाते. अर्जदाराचा मृत्यू झाल्यास उन्हाळ्यात चार-साडेचार तासांत तर हिवाळ्यात पाच-साडेपाच तासांत देहदानाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

२४ तास सेवा...
खासगी मेडिकल कॉलेजमध्ये २४ तासांत केव्हाही मृतदेह स्वीकारला जातो. देह घरापासून कॉलेजपर्यंत आणण्याचे काम संबंधित कॉलेज प्रशासन करते. परगावाहून मृतदेह तातडीने कॉलेजमध्ये आणण्यासाठी नातेवाइकांनी स्वतःचे वाहन वापरल्यास तो खर्च कॉलेज देते. मात्र सरकारी कॉलेजमध्ये नातेवाइकांनी मृतदेह कॉलेजपर्यंत आणून द्यावा लागतो. सध्या आमच्याकडे पन्नास मृतदेह असून आणखी पाच ‘वेटिंग’वर आहेत. चांगल्या सेवेमुळेच ९००हून अधिक जणांची नोंदणी आमच्याकडे झाली असल्याचे डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे लॅब टेक्‍निशियन (शरीररचना शास्त्रविभाग) ए. के. बंडगर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

देहदान केव्हा होते...?
देहदान करताना संबंधित व्यक्ती मृत झाल्याचा अहवाल रजिस्टर असलेल्या डॉक्‍टरांकडूनच आवश्‍यक असतो. अहवालात मृत्यूचे कारण आवश्‍यक असते. एखाद्या मृतदेहास जखमा झाल्यास असा देह स्वीकारला जात नाही. मृत्यूनंतर किमान चार-पाच तासांत मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये न्यावा लागतो.

प्रक्रिया काय असते
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला जर देहदान करायचे असल्यास त्याची नोंदणी कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये केली जाऊ शकते. त्यासाठी असलेल्या विहित नमुन्यातील अर्ज भरावा लागतो. अर्जाबरोबरच सर्व वारसदारांच्या सह्या आणि संमतीपत्र आवश्‍यक असते. नोंदणीनंतर केव्हाही मृत्यू झाल्यास संबंधित मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहाला जागा उपलब्ध करून दिली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com