पेट्रोलियम तज्ज्ञ सदानंद जोशी वालचंदच्या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

सांगली - येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा यंदाचा माजी विद्यार्थी मेळावा शनिवारी (ता.14) होत आहे. यंदाच्या मेळाव्यासाठी पेट्रोलियम क्षेत्रातील जागतिक किर्तीचे तज्ज्ञ डॉ.सदानंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती आहे. 1992 च्या बॅचचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या बॅचसह 1981, 2002 आणि 2006 या बॅचचे विद्यार्थी यंदासाठी विशेष आमंत्रित आहेत. दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या शनिवारी होणाऱ्या या मेळाव्यासाठी जगभरात स्थिरावलेले "वालचंद'चे माजी विद्यार्थी आवर्जून हजेरी लावतात. संचालक जी.व्ही.पारीषवाड, संयोजन समितीचे प्रमुख प्रा.संजय धायगुडे यांनी ही माहिती दिली.

मुळचे रत्नागिरीचे जोशी यांचा अमेरिकीतील हार्ट पब्लिकेशनने "पेट्रोलियम क्षेत्रातील जगातील पहिल्या शंभर व्यक्तींमधील प्रभावशाली व्यक्ती' म्हणून निवड केली आहे. भूगर्भात आडवा छेद देऊन तेलविहीरी शोधण्याच्या त्यांच्या संशोधनाला "जोशी समीकरण' नावाने ओळखले जाते. जोशी यांनी अरब देशांसह जगभगारीत नेक तेल कंपन्यासोबत विशेष सल्लागार काम केले आहे. 1983 मध्ये त्यांनी नऊ वर्षापासून कार्यरत फिलिप्स पेट्रोलियम कंपनीतून राजीनामा देऊन स्वतःची जोशी टेक्‍नॉलॉजीत इंटरनॅशनल (जेटीआय) ही कंपनी स्थापन केली. सध्या ते या कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात. 1995 पासून त्यांची ही कंपनी भारतासोबत करार करून तेलनिर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या "जेटीआय'तर्फे भारत-अमेरिका, आफ्रिका आदी देशांमध्ये तेल वायू प्रकल्पांचे व्यवस्थापन पाहिले जाते. वालचंदच्या 1972 च्या मेकॅनिकल शाखेचे आणि मुंबई "आयआयटी'चे ते माजी विद्यार्थी आहेत. मुंबई आयआयटीने 2003 मध्ये त्यांना सर्वोत्तम माजी विद्यार्थी म्हणून गौरवले आहे. तेल संशोधन क्षेत्रात त्यांचे पन्नासावर शोधनिबंध त्यांनी जगभरातील विविध देशांच्या व्यासपीठावर सादर केले आहेत. तीसहून अधिक देशात त्यांनी दोनशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत.

Web Title: walchand campaign chief guest sadanand joshi