वैदिक शास्त्रांचा अभियांत्रिकीशी समन्वय हवा - अभिजित पवार

अभिजित पवार यांचे प्रतिपादन; ‘वालचंद’मधील उद्योग परिषदेमध्ये पंधरा सामंजस्य करार
walchand Industry Council Vedic sciences should be coordinated with engineering abhijit pawar sangli
walchand Industry Council Vedic sciences should be coordinated with engineering abhijit pawar sanglisakal

सांगली : ‘‘प्राचीन भारतीय परंपरेमधील वेद-उपनिषदांमधील शास्त्र आणि सध्याचे आधुनिक विज्ञान यांची सांगड अभियांत्रिकीशी घातली पाहिजे. यामध्ये समन्वय साधण्यासाठी अभियंत्यांनी पुढे यावे. त्यांना मदत करण्यास मी तयार आहे,’’ असे आवाहन ‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी आज येथे केले.

येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात बहुराष्ट्रीय कंपन्यांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित उद्योजक परिषदेच्या उद्‍घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यानिमित्ताने उद्योजक आणि महाविद्यालयांमध्ये तंत्रज्ञान आदान-प्रदानाबरोबर एकत्रित काम करण्यासंबंधीचे पंधरा सामंजस्य करार झाले. महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पवार यांनी,‘‘अभियांत्रिकी शिक्षणाची प्रासंगिकता आजच्या शिक्षणधुरिणांनी अनेकांगांनी तपासायला हवी,’’ असे आग्रहपूर्वक नमूद करतानाच,‘‘पाश्‍चात्य कंपन्यांच्या पॅकेजच्या दिशेने पाहणारा नव्हे; तर देश उभारणीत योगदान देणारा अभियंता घडवला पाहिजे,’’ असे स्पष्ट मत मांडले. ते म्हणाले, ‘‘आपण नेहमीच भारतीय प्राचीन परंपरांबद्दल अभिमानाने बोलतो, ‘वसुधैव कुटुंम्बकम्’ची परंपरा सांगतो, आर्यभट्टची ओळख सांगतो; मात्र ती परंपरा आपल्या शिक्षणात कोठे आहे? ती संस्थात्मक पातळीवर आणण्याचा प्रयत्न का करीत नाही? एकदा जर्मनीच्या दौऱ्यावर असताना मला तेथील मंत्र्यांनी भारतीय वास्तूशास्त्राच्या परंपरेबद्दल विचारणा केली.

हजारो वर्षांचे आपले स्‍थापत्यशास्त्र ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांच्या प्रभावाखाली जाते आणि मग आपल्याला घर बांधण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदवीधरांची गरज भासू लागली. त्या मानसिकतेत आपण आजही अडकून पडलो आहोत. हा प्रगत आणि आधुनिक दृष्टिकोन मानला जातो आणि ही आधुनिक म्हणवली जाणारी मानसिकता नव्या विचारांची दारे बंद करताना दिसते. आपल्याला लहानपणापासून ‘कॉन्संट्रेशन’ करा, ‘फोकस’ करा,’ एवढेच शिकवले जाते; मात्र ते करा म्हणजे काय, हे सांगितले जात नाही. प्रश्‍न विचारण्याऐवजी, ‘सांगितलेले ऐक,’ असेच शिकवले जाते. येथून बाहेर पडल्यानंतर मात्र ‘आऊट ऑफ बॉक्स’ असा विचार करा,’ असे सांगितले जाते.

नेहमी तुम्हाला ‘बॉक्स’मध्ये ठेवून, तुम्ही वेगळा विचार करणार कसा? आपले शिक्षणाचे उद्दिष्टच मुळी ‘रोटी कपडा और मकान’ म्हणजेच परदेशात स्थायिक होणे, मोठमोठी पॅकेज मिळवणे, असा असेल तर मग जगाला प्रकाश-दिशा दर्शविणारी परंपरा आपण का सांगतो? त्यामुळे पुन्हा एकदा मागे वळून बघायला हवे. आपले भारतीय शास्त्र-परंपरा खूप पुढे होत्या. ज्या काळात आजचे तंत्रज्ञान नव्हते, अशा काळात आपल्या पंचांगांनी ग्रह-ताऱ्यांमधील अंतरे निश्‍चित केली होती. मग आपल्या अवकाश संशोधनशास्त्रात पंचांगांची संलग्नता सांगता येईल का, या दिशेने अभ्यास का होत नाही? ही शास्त्रे आजच्या ‘इंटिलिजन्स सायन्स’शी त्यांना जोडता येईल का? भगवद्‍गीतेत सर्व प्रश्‍नांची उत्तरे आहेत, असे आपण आजवर ऐकत आलो आहोत. मग ते तत्त्वज्ञान आपल्या नित्य जगण्यात आणता येईल का? गीतेचा ‘कर्मयोग’ आम्ही आचरणात आणला पाहिजे. हे स्थितीवादी नव्हे, तर ‘कर्मवादी’ तत्त्वज्ञान आहे. आपले अभियांत्रिकी शिक्षण या सर्वांपासून दूर गेले आहे. नव्या अभियंत्यांनी ही आव्हाने स्वीकारली पाहिजेत. इथे अमर्याद संधी आहेत. त्या केवळ वैयक्तिक उन्नतीच्या नव्हेत; तर अंतिमतः आपल्या देशाच्या आणि मानवजातीच्या उत्कर्षासाठीही ही आव्हाने पेलली पाहिजेत.’’

प्रा. संजय धायगुडे यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे उपसंचालक प्रताप सोनावणे यांचे भाषण झाले. प्रा. कृष्णकेदार गुमास्ते, प्रा. विद्याधर धर्माधिकारी यांनी महाविद्यालयाची वाटचाल आणि उद्दिष्टांचा आढावा घेतला. महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, माजी महापौर सुरेश पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी श्रीनिवास पाटील, हिंदूस्थान एरोनॉटिक्सचे संचालक दीपक शिंदे-म्हैसाळकर, प्रसादिती इंडस्ट्रीजचे प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रा. अनंत कोकणे यांनी सूत्रसंचालन केले.

स्वतःला ओळखा; व्यक्तिमत्त्व ओळखा

अभिजित पवार म्हणाले, ‘‘तुम्ही स्वतःला ओळखणे म्हणजे तुमचे व्यक्तिमत्त्व ओळखा. व्यक्तिमत्त्व ओळखण्याचे अनेक मार्ग आहेत. या अनेक मार्गापैंकी आपल्या इथे काही अभ्यासकांनी त्यांची मांडणी केली आहे. त्यातील एक मार्ग मला आवडला. या अभ्यासकांनी व्यक्तिमत्त्वे चार असल्याची मांडणी केली आहे. भावनेपेक्षा बुद्धीला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व ज्ञानमार्गाच्या दिशेने जात असल्याचे ते सांगतात. ते उलट असेल तर ती व्यक्ती भक्तिमार्गाची असते. दोन्हींचा समतोल असेल तर ती व्यक्ती ‘कर्मयोगी’ आणि दोन्ही कमी असेल तर ती व्यक्ती ‘हटयोगी’ या योगशास्त्रांतील मांडणीनुसार असल्याचे काही अभ्यासक सांगतात. एखादा मार्ग श्रेष्ठ आहे आणि एखादा मार्ग चांगला नाही, असे नाही. सगळे मार्ग चांगले आहेत. पण आपण नेमके कोणत्या वर्गात मोडतो, हे आधी स्वतः ओळखा आणि त्यानुसार तुमचे करिअर ठरवा; अन्यथा आयुष्यभर नावडीच्या क्षेत्रात काम करून आयुष्याच्या शेवटी ‘आपण या क्षेत्रात का आलो,’ असा प्रश्‍न आपण स्वतःलाच विचारत राहतो.’’

नवउद्यमींसाठी आवाहन

दुपारच्या सत्रात अभिजित पवार यांनी ‘करिअरच्या संधी आणि स्टार्टअप’ यावर माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षण, भांडवली गुंतवणूक, संवाद माध्यमे, ‘स्मार्ट सिटी’, पायाभूत सुविधा, शेती, ‘कम्युनिटी डेव्हलपमेंट’ अशा विविध क्षेत्रांमध्ये ‘सकाळ समूह’ आणि ‘सकाळ’ची विविध व्यासपीठे नवउद्यमींसाठी योगदान देऊ शकतील. याबाबत विद्यार्थ्यांनी केव्हाही संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. सुमारे अर्धा तासांच्या या सत्रात मुलांनी आपल्या अनेक नवसंकल्पना मांडल्या. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात वेदिक विज्ञानाची पूरक विद्याशाखा विकसित व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com