'वालचंद' जगात अव्वल ठरावे - डॉ. सदानंद जोशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

सांगली - "वालचंद' राज्य आणि देशात अग्रेसर आहेच, मात्र जगातील अव्वल महाविद्यालय ठरावे, अशी अपेक्षा पेट्रोलियम उद्योग क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ डॉ. सदानंद जोशी यांनी व्यक्त केले.

सांगली - "वालचंद' राज्य आणि देशात अग्रेसर आहेच, मात्र जगातील अव्वल महाविद्यालय ठरावे, अशी अपेक्षा पेट्रोलियम उद्योग क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ डॉ. सदानंद जोशी यांनी व्यक्त केले.

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. खासदार संजय पाटील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे संचालक जी. व्ही. पारिषवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. गेली 69 वर्षे अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या या महाविद्यालयाच्या जगभरात विखुरलेल्या अभियंत्यांचा दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या शनिवारी मेळावा होत असतो. यंदा 1972 च्या मेकॅनिकल शाखेचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. जोशी मेळाव्याचे प्रमुख पाहुणे होते.

वालचंद महाविद्यालयाने माझ्या आजवरच्या वाटचालीचा पाया घातल्याचे कृतज्ञतापूर्वक नमूद करून डॉ. जोशी म्हणाले, 'इथले सर्व शिक्षक, मला शिक्षणापासून सर्व काही करण्याचे स्वातंत्र्य देणारे माझे आईवडील आणि कुटुंबीयांच्या पाठबळामुळेच हा प्रवास शक्‍य झाला.'' मेळाव्याचे मुख्य संयोजक प्रा. संजय धायगुडे म्हणाले, 'महाविद्यालयाचे जगभरातील 25 हजार माजी विद्यार्थी हेच आमचे बलस्थान आहे. त्यांच्यामुळेच महाविद्यालयाच्या प्रशिक्षण आणि "प्लेसमेंट' विभागाचा आलेख सतत चढता आहे. पारिषवाड, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील यांचेही या वेळी भाषण झाले.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या चेन्नई विभागाच्या महानिरीक्षक विद्या कुलकर्णी, दीपक शिंदे-म्हैसाळकर, "टीसीएस'चे मोहन मार्डीकर, रिलायन्सचे अजित गुप्ते, कर्नल जगदीश खाडिलकर या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार झाला.

"वालचंद'चे पावित्र्य टिकावे
खासदार संजय पाटील म्हणाले, 'वालचंद महाविद्यालयामुळे गेल्या 70 वर्षांत समाजातील गुणवत्तेला न्याय मिळाला. हा कुणाच्या महत्त्वाकांक्षेचा अड्डा बनू नये, अशी भावना दीपकबाबा शिंदे आणि त्यांच्या सर्व माजी विद्यार्थ्यांची होती. त्या भावनेपोटीच आम्ही इथे अवैधरीत्या कब्जा घेतलेल्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन पिटाळून लावले. आम्हा राजकारण्यांची महाविद्यालये धनवंतांना गुणवंत करणारी आहेत. इथे ते नाही. त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांना मोठे करणाऱ्या या महाविद्यालयासाठी, या परिसरासाठी आपण योगदान द्यावे एवढी अपेक्षा मी इथे व्यक्त करतो.''

Web Title: WALCHAND making the worlds top