वंचित आघाडी'च्या माजी जिल्हाध्यक्षाला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

- विद्यापीठात नोकरी लावतो म्हणून तरुणाची फसवणूक

सोलापूर : सोलापूर विद्यापीठात नोकरी लावतो म्हणून तरुण शेतकऱ्याची 2 लाख 65 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचा माजी जिल्हाध्यक्ष धम्मपाल रेवण माशाळकर (रा. रमापती चौक, न्यू बुधवार पेठ, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोलापुरातून कुटूंबासह सामान घेवून पळून जाण्याच्या तयारी असताना पोलिसांनी माशाळकर यास अटक केली आहे.

किरण भारत चव्हाण (वय 29, रा. रानमसले ता. उत्तर सोलापूर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. 20 जानेवारी 2013 पासून 24 जुलै 2019 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. चव्हाण हे 2013 साली सौंदणे (ता.मोहोळ) येथील कै.बाबूराव पाटील माध्यमिक शाळेत शिपाई म्हणून कामाला होते. तेथील शिक्षक प्रकाश गुंड यांचा मित्र आरोपी धम्मपाल माशाळकर याने 2013 साली विद्यापीठ येथे क्‍लार्क व शिपाई पदाच्या जागा निघाल्या असून विद्यापीठाचे कुलसचिव सोनजे यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचे सांगितले.

क्‍लार्क पदासाठी पाच लाख रूपये रेट चालू असल्याचे सांगून क्‍लार्कची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्याकरिता पहिले निम्मे पैसे द्यावे लागतील असे सांगून 20 जानेवारी 2013 रोजी दोन लाख 65 हजार रुपये घेतले. त्यानंतर 5 मार्च 2013 रोजी चव्हाण यांच्या घरी पोस्टाने सोलापूर विद्यापीठ येथे क्‍लार्क पदावर कायमस्वरुपी नेमणूक झाल्याचे पत्र आले. ऑर्डर घेऊन नोकरीसाठी हजर होण्यासाठी गेल्यानंतर नोकरीची ऑर्डर बोगस असल्याचे समजले. चव्हाण यांनी माशाळकर यास फोन करून याबाबत कळविले. त्यानंतर माशाळकर याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. पैशांच्या बदल्यात 2 लाख 65 हजारांचा धनादेश दिला. तो धनादेश वटला नाही. त्यानंतर माशाळकर उद्या पैसे देतो असे म्हणून चव्हाण यांना गप्प बसविले. नोकरी न लावता पैसे परत न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणात धम्मपाल माशाळकर याच्यावर गुन्हा दाखल झाला असून सामान घेवून पळून जाण्याच्या तयारीत असताना पुना नाका परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याची चौकशी सुरु आहे. -यशवंत केडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wanchit Aghadis District President is Arrested