मंत्री व्हायचे आहे.... मोदी, शहांवर करा टीका

मंत्री व्हायचे आहे.... मोदी, शहांवर करा टीका

सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्था किंवा केंद्रात एखादे मोठे पद मिळवायचे असेल तर पक्षातील ज्येष्ठ व वरिष्ठांवर जाहीर टीका करा, पद आपोआप आपल्यापर्यंत चालत येईल, अशी भावना सोलापुरातील भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. अगदी केंद्रातील मंत्रीपदही मिळेल असे उघड बोलले जात आहे.

पदाधिकाऱ्यांना पकडले खिंडीत 
महापालिकेतील महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारीवरून येथील शहर भाजपमध्ये जोरदार घमासान सुरु झाले आहे. उपमहापौरपदाची उमेदवारी नगरसेवक राजेश काळे यांना दिल्याच्या निषेधार्थ सात नगरसेवकांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. इतकेच नव्हे तर पक्षाने राजीनामे स्वीकारले नाहीत तर विभागीय आयुक्तांकडे राजीनामा देऊ अशी भूमिका घेऊन श्रेष्ठींना खिंडीत गाठले आहे. 

... टीकाकार मंत्री झाले तर आश्‍चर्य वाटणार नाही 
भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्रातले पहिले आमदार - खासदार दिवंगत लिंगराज वल्याळ यांच्याबाबत अपशब्द बोलल्याबद्दल श्रीनिवास करली यांना अनेकांचा विरोध पत्करून महापालिकेतील सभागृह नेते पद देण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर किशोर देशपांडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राजेश काळे यांना उपमहापौरपदाच्या उमेदवारीची बक्षिसी देण्यात आली. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठांबद्दल टीका-टिपण्णी, आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना पदे मिळत असतील तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करणाऱ्याला केंद्रात एखादे मंत्रीपद मिळाले तर त्यात कोणाला आश्‍चर्य वाटणार नाही, अशी उपरोधिक टीका भाजपांतर्गत सुरु झाली आहे. 

एकनिष्ठ होताहेत पक्षापासून दूर 
आताची भाजप पूर्वीसारखी राहिली नाही. वाजपेयी - आडवाणींच्या काळात तत्वनिष्ठा होती, पक्षनिष्ठा होती, पक्षाच्या धोरणानुसार आंदोलने, टीका टिप्पण्णी केली जात होती. मात्र आता ते दिवस राहिले नाहीत. प्रत्येकाला आपला हेतू साध्य करून घ्यायचा आहे. मग त्यासाठी पक्षाची ध्येयधोरणे, तत्व हे त्यांच्या दृष्टीने गौण आहेत. त्यापेक्षा आपण दूर राहिलेले बरे, अशी भूमिका घेत भाजपच्या अनेक जुन्या व निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवांत बसणे पसंत केले आहे. वाजपेयी - अडवाणींचीच खरी भाजप होती, असे अनेकजण खासगीत बोलतात. भाजप वाढविण्यासाठी रक्ताचे पाणी करणारे आज बाजूला राहिले आहेत. निवडणूक काळात आवर्जून आठवण करणाऱ्यांना आमदार, खासदार, मंत्री झाल्यावर ज्येष्ठांचा विसर पडतो आणि नातेवाईक व जवळच्यांना "लाभा'चे पद दिले जाते. आम्हाला लाभाचे पद नको, पण किमान सन्मान तरी मिळावा, अशी या एकनिष्ठांची अपेक्षा आहे, मात्र तीही पूर्ण होत नसल्याची त्यांची खंत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com