वारी मार्गांचा होणार बृहत्‌ आराखडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

फलटण - आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गाचे व परिसराचे यावर्षी शास्त्रीय सर्वेक्षण करण्याबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी पानांच्या एक कोटी पत्रावळ्यांचे वितरण आणि वापरल्या जाणाऱ्या पत्रावळ्यांचे संकलन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय विद्यार्थी दिंडीद्वारे निर्मल वारीसह विविध पथनाट्याद्वारे मनोरंजन, वैज्ञानिक व पर्यावरणीय प्रबोधन करण्यात येईल. स्वच्छ व पर्यावरणपूरक वारीसाठी थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता मंचही योगदान देणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण संवर्धन राष्ट्रीय विद्यार्थी दिंडीद्वारे या बाबींना प्राधान्य देण्यात येईल. वारी कालावधीत स्वच्छ भारत अंतर्गत समर इंटर्नशिपच्या  माध्यमातून निर्मल वारी अभियान, सेंद्रिय खतनिर्मिती व विज्ञान दिंडी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय विद्यार्थी दिंडीत १२ हजार विद्यार्थी सहभागी होणार असून त्यापैकी २०० विद्यार्थी प्रत्यक्ष वारकऱ्यांत राहून त्यांची शुश्रूषा, पोलिसांना मदत, वारी प्रमुखांना सहकार्य करतील. पथनाट्यातून मनोरंजन, वैज्ञानिक व पर्यावरणीय प्रबोधन आणि स्वच्छतेसाठी योगदान देतील. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम हे दोन्ही वारी मार्ग व परिसरातील सुमारे ३०० गावांतील ग्रामस्थ व दिंडीतील विद्यार्थी हे वारकऱ्यांसमवेत राहून मार्गावरील सामाजिक, भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक, पर्यावरण व आरोग्यविषयक सर्वेक्षण करतील. त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे संशोधन करून वारी मार्गासह ३०० गावांचा आरोग्यासह इतर बाबींचा बृहत्‌ आराखडा तयार करणार आहेत.

साधारण चार हजार विद्यार्थी निर्मल वारीत शेवटपर्यंत सहभाग घेतील. सावित्रीबाई फुले विद्यापीठासोबत शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, निर्मल वारी सहयोग व थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता मंच आदी मिळून सुमारे ४०० महाविद्यालयांतील १२ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. वारीदरम्यान पानांपासून बनविलेल्या एक कोटी पत्रावळ्यांचे वितरण करण्यात येणार असून वापर केलेल्या पत्रावळ्यांचे संकलन करून वारी मार्गावरील गावांत किंवा महाविद्यालयाच्या परिसरात त्याचे कंपोस्ट खत तयार करून शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

दिंडीत १०० विद्यार्थी बनणार आरोग्यदूत
निर्मल वारी अभियानात सहभागी विद्यार्थी साखळी पद्धतीने उभे राहून वारकऱ्यांना तात्पुरत्या व फिरत्या शौचालयाकडे वळविणे, उघड्यावर शौचाला बसू न देणे याबाबत सहकार्य करतील. १०० विद्यार्थी आरोग्यदूत म्हणून काम करणार आहेत, अशा प्रकारची माहिती कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी दिली. 

Web Title: Wari be enlarged plan strategies