wari 2019 : पंढरपुरातील वारकरी परतीच्या वाटेवर 

प्रतिनिधी
रविवार, 14 जुलै 2019

सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि चंद्रभागेतील स्नानाची पर्वणी साधण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूर मुक्कामी असलेले वारकरी आषाढीचा भव्य सोहळा आपल्या मनात साठवत शनिवारी (ता.१३) परतीच्या वाटेवर निघाले.

पंढरपूर, जि. सोलापूर - सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि चंद्रभागेतील स्नानाची पर्वणी साधण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूर मुक्कामी असलेले वारकरी आषाढीचा भव्य सोहळा आपल्या मनात साठवत शनिवारी (ता.१३) परतीच्या वाटेवर निघाले. त्यामुळे एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशनवर गावाकडे परतण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी झाली. अनेक वारकरी खासगी वाहनाने आले होते. त्यामुळे सर्व वाहने एकाच वेळी शहराच्या बाहेर पडत असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. 

यंदा दुष्काळाची परिस्थिती असूनही वारकऱ्यांची संख्या अधिक राहिली. सुमारे बारा लाखांहून अधिक वारकरी यंदा पंढरीत आले होते. शुक्रवारी आषाढी एकादशीच्या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरीत भक्तीचा महापूर आला होता. आषाढी यात्रेची सांगता ही परंपरेनुसार आषाढी पौर्णिमेच्या गोपाळ काल्याने होते. पौर्णिमा मंगळवारी (ता. १६) आहे. त्यापूर्वी शेकडो वारकरी गोपाळकाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी होणारा महाद्वार काला झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघतात. 

मात्र, अलीकडे द्वादशीपासूनच वारकरी परतीच्या प्रवासाला निघतात. त्यामुळे बहुसंख्य वारकऱ्यांनी परतीची वाट धरली. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच पंढरपूरमधून बाहेर जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर परतीसाठी वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. प्रबोधनकार ठाकरे चौकाकडून के.बी.पी. कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक बराच वेळ मंद गतीने सुरू होती. त्याशिवाय नवीन पूल, ६५ एकर परिसर, सांगोला रस्ता, कराड रस्ता, सातारा रस्ता, पुणे रस्ता या मार्गावर वाहतूक सुरळीत व्हायला वेळ जात होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warkari return to home