चंदगडमधील 'या' 20 गावांना स्थलांतर करण्याचा इशारा

सुनील कोंडुसकर
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

स्थलांतर करण्याचा इशारा देण्यात आलेली गावे अशी -

पुंद्रा,  मोजे सडेगुडवळे, पिळणी, भोगोली, कानुर खुर्द,कानुर बु., विजुर, इनामम्हाळूंगे, कुरणा, गवसे, कानडी, इब्राहिमपुर, हिंडगाव, फाटकवाडी, इनाम सावर्ड, उत्साळी, सत्तेवाडी, पोवाची वाडी, अडकूर, गणुचीवाडी

चंदगड - फाटकवाडी ( घटप्रभा ) मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याच्या बाजूची भिंत तीन दिवसापूर्वी काही प्रमाणात खचली. तसेच डोंगराकडील माती घसरत असल्याने भविष्यात अधिक धोका होऊ नये, यासाठी सतर्कता म्हणून घटप्रभा नदीकाठच्या वीस गावांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचा  इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती चंदगड तहसीलदार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

संततधार पाऊस, पुरस्थिती असताना या धोक्याच्या इशाऱ्यामुळे या गावातून भितीचे वातावरण आहे. 1541.50 दशलक्ष घनफूट पाणी क्षमतेचा हा प्रकल्प 2 जुलैला पूर्ण क्षमतेने भरला आहे. कोकण सीमेवर आंबोली नजीक या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस असतो. या वर्षी पावसाचे प्रमाण जास्तच असून गेले तीन -चार दिवस ढगफुटी सदृष्य पाऊस कोसळत आहे. तीन दिवसापूर्वी सांडव्याच्या बाजूच्या भिंतीचा काही भाग कोसळला असून डोंगराकडील माती घसरु लागली आहे. भविष्यात धोका नको म्हणून पाटबंधारे खात्याने नदीकाठच्या सडेगुडवळे, पिळणी, भोगोली, कानुर खुर्द, पुंद्रा, कानूर बुद्रूक, बिजूर, कुरणी, इनाम म्हाळुंगे, गवसे, कानडी, इब्राहीमपूर, हिंडगाव, फाटकवाडी, इनाम सावर्डे, उत्साळी, सत्तेवाडी, पोवाचीवाडी, अडकूर, गणुचीवाडी या वीस गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गाव पातळीवरील जबाबदार लोकांनी स्थानिक ग्रामस्थांची समजूत घालून या बिकट स्थितीत एकमेकांना धीर देण्याची व खबरदारी घेण्याची गरज आहे.

" फाटकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दररोज 200- 225 मिली मीटर एवढया मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे . हा पाऊस प्रकल्पाला धोकादायक ठरू शकतो . त्यामुळे खबरदारी म्हणून सतर्कतेचा इशारा दिला आहे. " 
- पी .बी. पाटील,
उपअभियंता, पाटबंधारे विभाग, चंदगड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning of immediate migration of these 20 villages in Chandigarh