(व्हिडिओ)घंटागाडी आली हो कचरागाडी आली...

अमित आवारी
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

महापालिकेने शहरातील घनकचऱ्याच्या संकलनासाठी नवीन ठेकेदार कंपनी नियुक्‍त केली. या कंपनीची वाहने कचरासंकलनासह जनजागृतीचेही काम करीत आहेत.

नगर :  भल्या सकाळचा प्रहर... कानावर आवाज येतो "घंटागाडी आली हो कचरागाडी आली..' काही क्षण, दारात वासुदेव आला की काय, असा भास होतो. मधुर सुरात ध्वनिवर्धकावर चाललेले गाणे ऐकून नागरिक घरातील कचरा उचलण्यासाठी धावतात. कचरासंकलनाबरोबरच नागरिकांचे प्रबोधनही साध्य होते. 

महापालिकेने शहरातील घनकचऱ्याच्या संकलनासाठी नवीन ठेकेदार कंपनी नियुक्‍त केली. या कंपनीची वाहने कचरासंकलनासह जनजागृतीचेही काम करीत आहेत. शहरातील स्वच्छता व त्यासोबतच प्रबोधन करणाऱ्या या वाहनांमुळे कचऱ्याची समस्या कमी होत आहे. साहजिकच, महापालिका कर्मचाऱ्यांचाही ताण कमी झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील कचरासंकलनाच्या समस्येने उग्र रूप धारण केले होते. "स्वयंभू ट्रान्सपोर्ट'मार्फत कचरासंकलनाचे काम सुरू झाल्यामुळे ही समस्या मार्गी लागत आहे. या संस्थेची 55 वाहने शहरात कचरासंकलनाचे काम करीत आहेत.

केंद्राकडून 28 कोटींचा निधी 

शहरात अनेक दिवसांपासून कचऱ्याची समस्या जटिल बनत गेली होती. बुरुडगाव कचराडेपो हरित लवादात अडकल्याने बंद आहे, तर माळीवाडा येथील कचरा रॅम्प नुकताच "बंद' करण्यात आला. त्यामुळे शहरातील कचरासंकलनाची समस्या वाढतच गेली. महापालिका प्रशासनाकडेही पुरेशी वाहने नसल्याने, शहरातील कचरासंकलन कसे करावे, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नवीन 70 घंटागाड्या, चार ट्रक, एक जेसीबी, चार कॉम्पॅक्‍टरचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. स्वच्छ भारत अभियानातून 28 कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मिळाला. त्याचा वापर वाहनखरेदीसाठी विचाराधीन आहे. ही वाहनखरेदी होईपर्यंत स्वयंभू ट्रान्सपोर्टला शहरातील कचरासंकलनाचा ठेका दिला आहे. 

"स्वयंभू'कडे 40 घंटागाड्या 

स्वयंभू ट्रान्सपोर्टकडे 40 घंटागाड्या आहेत. त्यांवर ध्वनिक्षेपक बसविले आहेत. त्यावरून पारंपरिक गाण्याच्या तालावर जनजागृती केली जाते. स्वच्छतेसंदर्भात नियम, ओल्या व सुक्‍या कचऱ्याची माहिती, शहरातील स्वच्छतेबाबत प्रबोधन केले जात आहे. गेल्या चार वर्षांपासून देशात स्वच्छता अभियान राबविले जात असताना, महापालिका प्रशासनाने कधीही अशाप्रकारे स्वच्छतेबाबत जनजागृती केली नव्हती. शहरातील स्वच्छताही महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून योग्यरीत्या होत नव्हती. घनकचरा विभागातील अधिकारी व ठेकेदार बदलताच शहरात स्वच्छता सुरू झाल्याची चर्चा आहे. 

ही वाहने करतात कचरासंकलन 

स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या 40 घंटागाड्या, 10 टेम्पो, हॉटेल व व्यापारी भागातील कचरा उचलण्यासाठी पाच वाहने, अशी 55 वाहने कार्यरत आहेत. शिवाय महापालिकेचे नऊ ट्रॅक्‍टर, पाच टेम्पो, दोन कॉम्पॅक्‍टरही कचरासंकलन करीत आहेत. त्यातील हॉटेले व व्यापारी दुकानांसमोरील कचरा उचलण्याचे काम मध्यरात्री केले जाते. उर्वरित वाहने सकाळी कचरासंकलनाचे काम करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waste collection as well as citizens' awareness