कचरा घंटागाडीवर घुमतोय तरुणाईचा आवाज

कचरा घंटागाडीवर घुमतोय तरुणाईचा आवाज

कोल्हापूर - एक-दोन दिवस कचरा घंटागाडी आली नाही, की घराघरांत कचरा साठतो. महापालिकेवर, तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांवर राग निघू लागतो. कधी कचरा उचलणार हाच सर्वांच्या मनातला संतप्त सवाल असतो. अशावेळी कचरा घंटागाडीवाला येण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो; पण अशावेळी ते दहा-बारा जण एकत्र येतात.

महापालिकेतून कचरा घंटागाडी आणतात आणि स्वत:च घंटा वाजवत आपल्या भागातून घंटागाडी फिरवितात. घंटागाडीवर नेहमीच्या कर्मचाऱ्यांऐवजी गल्लीतील ही पोरं पाहून गल्लीतल्या भगिनी आश्‍चर्यचकित होतात; पण पोरं ताई, आक्का, मावशी, काकी म्हणत बिनधास्त कचरा गोळा करतात आणि आपल्या परीने रोज नाही, पण अडीअडचणीच्या परिस्थितीत स्वच्छतेला हातभार लावतात.

रंकाळावेस, गंगावेसच्या हद्दीत असलेल्या धोत्री गल्ली परिसरातील काही तरुणांनी हा वेगळा उपक्रम केवळ एक सामाजिक बांधिलकी म्हणून जपला आहे. ते रोज हा उपक्रम करत नाहीत; पण ज्यावेळी कचरा घंटागाडीवाला सलग सुट्यांमुळे किंवा रजेमुळे नसेल त्यावेळी कचरा उचलला गेला नाही, की हे तरुण ‘आज आपण कचरा उचलू या’ असे ठरवतात. पहिल्या पहिल्यांदा त्यांची चेष्टाही केली गेली. त्यांना वेडे ठरवले गेले. काय महापालिकेला निवडणुकीला उभे राहणार आहे काय, अशी शेरेबाजीही झाली; पण हे तरुण विचलित झाले नाहीत.

आपण या समाजाचे देणं लागतो आणि आपापल्या भागातल्या कचरा आपणच गोळा केला, तर त्यात गैर काहीही नाही, या भावनेने ते जमेल तसे काम करत आहेत. लोकांनाही त्यांचे काम आवडले आहे. त्यांच्या या वेगळ्या उपक्रमाची चर्चा लोकांत आहे. आता त्यांचे कौतुकही होत आहे. आपण चौकाचौकांत टवाळक्‍या करत उभारणाऱ्या तरुणांवर टीकेची झोड उठवतो, पण काही तरुण असाही समाजाभिमुख उपक्रम राबवतात, याचे या परिसरात कौतुक आहे आणि ती इतर तरुणांना प्रेरणादायी आहे. 

मोहिमेचे शिलेदार 
या आपल्या वेगळ्या स्वच्छता मोहिमेचे शिलेदार संदीप कुंभार, आकाश चिखलकर, लखन निगवेकर, कन्हैया निगवेकर, केदार पाडळकर, अक्षय पाटील, सूरज कुंभार, ओंकार पाडळकर, मयूर निगवेकर, अंजना नवाळे वहिनी, छोट्या पाडळकर, अनिरुद्ध निगवेकर, रितेश येळवडेकर, राजू कुंभार, शुभम कुंभार, गौरव रसाळ.

आम्ही तरुण स्वयंप्रेरणेने हे काम करतो. वेगवेगळ्या विचाराने आम्ही असलो तरी आपल्या भागातील स्वच्छतेला आपला हातभार लावायचा, या हेतूने आम्ही हे काम करत आहे. हे काम फार मोठे काम आहे, असाही आमचा दावा नाही. आम्ही कोणावर टीकाही करत नाही; पण इतर भागातही तरुणांनी असा उपक्रम राबवण्यात व त्यापासून मिळणारे समाधान घेण्यास हरकत नाही.
- संदीप कुंभार,
उपक्रमात सहभागी तरुण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com