कऱ्हाडला सव्वाशेवर सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचा राहणार वॉच

सचिन शिंदे 
मंगळवार, 14 मे 2019

कऱ्हाडमध्ये मध्यंतरी दरोडेखोरांची टोळी सीसीटिव्हीतील फुटेजमुळे प्रत्यक्षात रंगोहात पकडण्यात आली. प्रत्यक्ष चोरटे मध्यरात्रीच्या सुमारास शहरात फिरत असल्याचे पाहून त्यांना पकडण्यात आले. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाले होते. पोलिसांनी सीसीटिव्हीच्या फुटेजमुळे त्यांना पकडण्यात यश आले.

कऱ्हाड : शहरातील वेगवेगळ्या चौकांसह अन्य अडचणीच्या ठिकाणी सुमारे सव्वाशे नविन सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येमार आहेत. त्यामुळे मुळ शहरासह त्याच्या वाढीव हद्दीतील हालचालीही आता कॅमेरा बद्ध होणार आहेत. त्यासाठी सुमारे 57 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचे नियोजन पालिकेने केले आहे. सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा प्रस्ताव नियोजन विभागाने मंजूरीसाठी पाठविला आहे. लवकरच त्याला मंजूरी मिळाल्यानंतर तो प्रकल्प शहरात राबविला जाणार आहे. 

शहरातील विविध ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे असावेत, अशी कल्पना काही वर्षापूर्वी प्रत्यक्षात आली. त्यानुसार काही पोलिसांनी तर काही पालिकेच्या माध्यमातून कॅमेरे बसवलेही. त्यातील तीसहून अधिक कॅमेरे कार्यान्वितही आहेत. सुमारे 52 कॅमेरे सध्या कार्यान्वित आहेत. त्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा फायदा पोलिसानाही झाला आहे. मध्यंतरी दरोडेखोरांची टोळी सीसीटिव्हीतील फुटेजमुळे प्रत्यक्षात रंगोहात पकडण्यात आली. प्रत्यक्ष चोरटे मध्यरात्रीच्या सुमारास शहरात फिरत असल्याचे पाहून त्यांना पकडण्यात आले. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाले होते. पोलिसांनी सीसीटिव्हीच्या फुटेजमुळे त्यांना पकडण्यात यश आले. शहरातील कचरा टाकणाऱ्यांना दंडही सीसीटिव्ही पाहून करण्यात आला. कोंडाळेमुक्त शहर झाले, मात्र त्यानंतर कोंडाळ्याच्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यावंर वॉच ठेवण्यासाठी सीसीटिव्हीचा वापर पालिकेने केला आहे. पालिकेच्या आवारत कॅमेरे बसविल्याने त्याचा फायदाच झाला आहे. सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर पालिकेने आणखी 125 कॅमेरे बसविण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेच्या नियोजन विभागाने त्याचा प्रस्ताव तयार केला आहे. 125 कॅमेऱ्यांसाठी सुमारे 57 लाकांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. तो तांत्रिक मंजूरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे त्यात अडचण निर्माण झाली आहे. 

शहरात सध्या 40 हून अधिक कॅमेरे कार्यान्वित आहेत. त्यात महत्वाची ठिकाणांचा समावेश आहे. त्यात संवेदनशील लोक वस्तीचा त्यात समावेश आहे. त्याशिवाय मुख्य बाजारपेठही कव्हर केली आहे. काही महत्वाच्या व ऐतिहासिक ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाढीव हद्द अजूनही काही भाग दुर्लक्षित आहे. त्या ठिकाणी कॅमेरे असावेत, अशी कल्पना पुढे आली. नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी त्या संकल्पनेस उचलून धरले. त्यांनी त्यासाठी तसा आराखडा केला. त्यानुसार पालिका आता दुर्लक्षीत राहिलेल्या सव्वाशेहून अधिक ठिकाणी कॅमेरे बसविणार आहे. त्याचा फायादा पालिकेला होणार आहेच, त्याशिवाय पोलिसांना त्याचा फायदा होणार आहे. सव्वाशे कॅमेरे बसविण्याचा काही आराखडा तयार केला आहे. मात्र त्या प्रस्तावाला तांत्रिक मंजूरी मिळाल्यानंतर त्या ठिकाणांवर सविस्तर चर्चा करून ती ठिकाण अंतिम केली जाणार आहेत. त्यामुळे अद्याप तरी ती ठिकाण कोणती आहेत, याबाबत गोपनियता पाळण्यात आली आहे. 

वाहतूक कोंडीही अजेंड्यावर घेण्याची गरज -
पालिकेने स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकविला. कचरा कोंडाळी मुक्तीनंतर शहर आता घंटागाडी मुक्तीकडे वाटचाल करताना दिसत आहे. त्याशिवाय सध्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा प्रश्नही मार्गी लागत आहे. त्या कॅमेऱ्याद्वारे चोऱ्यांसह अस्वच्छता करणाऱ्यांवरही वॉच राहतो आहे. त्याच कॅमेऱ्यांचा फायदा घेवून पोलिस व पालिका यांनी वाहतूकीची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. चोवीस तास चालणारी येथील वाहतूक कॅमेऱ्यात टिपली जात आहे. त्या सगळ्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय शोधण्यासाठी पोलिस व पालिकेने पुढाकार घेतल्यास शक्य तितक्या उपाय योजना हाती घेण्यात यश येईल, असे सामान्यांचे मत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी हटविण्याचा प्रश्नही आता अजेंड्यावर घेण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watch more than hundred CCTV cameras at Karhad