"वॉचमन' ते थेट चोरांचा म्होरक्‍या 

Watchmen became thieves
Watchmen became thieves

नगर : जेमतेम शिक्षण असल्याने "तो' मजुरीसाठी भटकत होता. आई-वडील नगरमध्ये "वॉचमन' म्हणून काम करीत होते. तोही "वॉचमन' झाला. "वॉचमन'चे काम करता करता, तो अट्टल घरफोड्या करणारा चोर झाला. पुढे तो घरफोडी करणाऱ्या टोळीचा "म्होरक्‍या' झाला. 

मजुरीच्या शोधात नगरला आला 
ही सत्यकथा आहे संजूची (नाव बदललेले). पुरेशी शेती नसल्याने मजुरीच्या शोधात संजूचे आई-वडील येथे आले. एमआयडीसी परिसरात मिळेल ते काम करू लागले. ठेकेदाराच्या कामाच्या "साइट'वर "वॉचमन' म्हणून काम करू लागले. त्यामुळे त्यांची राहण्याचीही सोय झाली. वडील "वॉचमन' म्हणून, तर कुटुंबातील इतर सदस्य मजुरी करीत. संजूही मिळेल ते काम करू लागला. कधी रात्री "वॉचमन' म्हणून लक्ष ठेवू लागला. सगळे काही व्यवस्थित चालले होते; पण नंतर मित्रांच्या मदतीने संजूही छोट्या-मोठ्या चोऱ्या करू लागला. दिवसभर शहरात फिरून टेहळणी करायची आणि रात्री घर फोडायचे, असा फंडा त्यांनी अवलंबिला. 

पहिली चोरी पचली 
सुरवातीला तो चोऱ्या करतोय, हे कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे त्याची प्रवृत्ती बळावत गेली. नंतर त्याने गावाकडून काही मित्रांना बोलावून घरफोड्या करण्यास सुरवात केली. चोरीसाठी अगोदर दुचाकी चोरायची. नंतर तिचा वापर घरफोडीसाठी करायचा. काम झाल्यावर दुचाकी कुठेतरी सोडून द्यायची, अशी संजूची पद्धत होती. 

अन्‌ तो रेकॉर्डवर आला 
नगरमधील एका राजकीय नेत्याचे घरच संजूच्या टोळीने फोडले आणि त्याची टोळी पोलिसांच्या रडारवर आली. तपासात पोलिसांना त्याच्याकडून जवळपास सात-आठ गुन्ह्यांची उकल झाली. त्याने त्या नेत्याची सोन्याची चेन काढून दिली. काही दिवस तो कारागृहात राहिला. जामिनावर बाहेर आल्यावर त्याने श्रीरामपूरमध्ये दुकाने व घरफोड्या केल्या. काही दिवसांपूर्वी राहुरीतील सराफाचे दुकान फोडले आणि तो पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याच्यासह अन्य सहकारीही गजाआड झाले. तोफखाना, एमआयडीसी, राहुरी, श्रीरामपूर पोलिस ठाण्यांत त्याच्याविरुद्ध तब्बल 15 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

काटकुळा असल्याचा फायदा 
शरीराने काटकुळा असल्याचा फायदा संजूला घरफोड्या करण्यात झाला. कितीही छोटी जागा असली, तरी संजू घरात शिरण्यात तरबेज झाला. आतापर्यंत उकल झालेल्या अनेक गुन्ह्यांत त्याने खिडकीचे गज कापून आणि काच काढून घरात प्रवेश केल्याची कबुली पोलिसांना दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com