बामणोली परिसरात पाणीच पाणी...!

संजय साळुंखे
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

सातारा - काही महिन्यांपूर्वी दुष्काळाच्या झळा सोसणारा बामणोलीचा परिसर पुन्हा एकदा पाण्याने खळाळू लागला आहे. ‘शिवसागर’मधील जलाशयामुळे सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. कोयना धरण तुडुंब भरल्याने स्थानिकांत उत्साहाचे वातावरण आहे. बोटिंगसह पर्यटकांची वर्दळ वाढल्याने त्यांना उत्पन्नाचे साधनही सुरू झाले आहे.

सातारा - काही महिन्यांपूर्वी दुष्काळाच्या झळा सोसणारा बामणोलीचा परिसर पुन्हा एकदा पाण्याने खळाळू लागला आहे. ‘शिवसागर’मधील जलाशयामुळे सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. कोयना धरण तुडुंब भरल्याने स्थानिकांत उत्साहाचे वातावरण आहे. बोटिंगसह पर्यटकांची वर्दळ वाढल्याने त्यांना उत्पन्नाचे साधनही सुरू झाले आहे.

कोयना धरणातील शिवसागर जलाशयातील पाण्याचा फुगवटा बामणोलीपर्यंत येतो. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शेतीतील उत्पन्नाला मर्यादा आहेत. त्यामुळे शिवसागर जलाशय हेच स्थानिकांच्या उत्पन्नाचे साधन आहे. यंदा जिल्ह्याप्रमाणेच बामणोली परिसरालाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. चोहोबाजूला अथांग पाणी असलेल्या या सधन भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. जलाशयाच्या पात्रातील कोयना नदीला एखाद्या ओढ्यासारखी कळा आली होती. जूननंतर सुरू झालेल्या संततधार पावसाने हे चित्र बदलले. बघता-बघता कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले अन्‌ बामणोलीचा परिसर पुन्हा एकदा पाण्याने खळाळू लागला आहे. 

कसे जाल - सातारा-बामणोली हे अंतर ३५ किलोमीटर आहे. साताऱ्याहून बस आहेत. मात्र, स्वतःचे वाहन घेऊन जाणे चांगले. 

काय पाहाल - साताऱ्याहून बामणोलीला जाताना वाटेत कास पठार, कास तलाव ही स्थळेही पाहण्यासारखी आहेत. बामणोलीत सध्या बोटिंग सुरू असल्याने शिवसागर जलाशयात फेरफटका मारता येतो. शेंबडी (विनायकनगर) येथील नारायण महाराजांचा मठ, तेथील गुहेत असलेली शिवपिंड पाहण्यासारखी आहे. या ठिकाणाहून कोयना, सोळशी व कांदाटी नद्यांचा झालेल्या संगमाचे दृश्‍यही पाहण्यासारखे आहे. पाणी कमी झाल्यानंतरच हा संगम दिसतो. 

व्यवस्था - बामणोली येथे राहण्याची व्यवस्था आहे; पण पुरेशा सुविधा नाहीत. सातारा-कासदरम्यान काही हॉटेल्समध्ये राहण्याची चांगली व्यवस्था होते. साताऱ्यातही राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सोय. ऑर्डरप्रमाणे मासेही बनवून मिळतात. 
(स्लाइड शो पाहा www.esakal.com वर)

Web Title: water in bamnoli area