अबबबऽऽ सातारकरांस पाण्याचे 25 लाख बिल !

प्रवीण जाधव
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून चाललेली सातारकरांची परवड अधिकाऱ्यांकडून दूर केली जात नाही. याबाबत लोकप्रतिनिधीही कोणतीही भूमिका घेताना दिसत नाहीत. त्यामुळे सातारकरांना कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बिलांच्या सावळ्यागोंधळामुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीस येत आहे. कुणाला एक तर, कुणाला दोन लाखांची बिले पाहून गरगरायला होत आहे. तामजाईनगरमधील एका घरगुती ग्राहकाला तब्बल 25 लाखांचे बिल पाठविण्याचा करिष्मा प्राधिकरणाने करून दाखवला आहे.

शहर व उपनगरांतील सुमारे 18 हजार ग्राहकांना पाणीपुरवठा करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केले जाते. नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठ्यावरून नागरिकांच्या नेहमी तक्रारी होतच असतात. परंतु, गेल्या वर्षापासून बिल वाटपाच्या गोंधळामुळे सातारकर मेटाकुटीला आले आहेत. प्राधिकरणाकडून पाण्याच्या मीटरचे रीडिंग घेणे, बिल तयार करणे व बिल वाटपासाठी खासगी एजन्सीला ठेका दिला जातो. त्या संस्थेकडून बिलांचे सर्व काम होत असते. सध्या कार्यरत असलेली एजन्सी ही डिसेंबर 2018 पासून साताऱ्यात काम करत आहे. परंतु, ती एजन्सी कशा प्रकारे काम करते, नागरिकांना व्यवस्थित सुविधा मिळते का, हे पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी ही जीवन प्राधिकरणाची आहे.

 
नियमानुसार दर दोन महिन्यांनी नागरिकांना बिल येणे आवश्‍यक आहे. परंतु, नागरिकांना तीन-तीन महिन्यांची बिले मिळत आहेत. त्यातही काहींना तीन महिन्यांची बिलेही सहा महिन्यांनी मिळत आहेत. अनेक ठिकाणी नागरिक घर बंद करून गेले नसतानाही त्यांना घर बंद असल्याचे गृहित धरून अंदाजे "लॉक बिलं' पाठविले जात आहेत. याचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे सातारकर घरात नसतातच का, हा प्रश्‍न निर्माण होतो. की संबंधितांकडून प्रत्यक्ष पाहणी न करताच बिले तयार केली जातात, असा मुद्दाही पुढे येतो.
 
एकतर बिलांचे वाटप होत नाही, त्यानंतर बिल भरले नाही म्हणून अधिभार लावला जात आहे. त्यामुळे नागरिकांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. बिलांचा या सावळ्यागोंधळात नागरिकांना सर्वांत मोठा धक्का बसतोय तो अव्वाच्या सव्वा बिलांचा. एकेकाला लाख-दोन लाखांची बिले येत आहेत. त्यामुळे एक हजाराच्या आत बिल असलेल्या नागरिकांना मोठा धक्का बसत आहे.

तामजाईनगर येथील एका ग्राहकाला तर, जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे तब्बल 25 लाख 51 हजार 786 रुपये बिल आले आहे. मागील थकबाकी व विलंब शुल्क असे मिळून त्यांना दहा नोव्हेंबरपर्यंत 25 लाख 59 हजार 287 रुपयांचे तर, त्या तारखेनंतर 76 हजार 763 रुपये विलंब शुल्क धरून 26 लाख 36 हजार 50 रुपये भरण्याचे बिल काढण्यात आले आहे. 

लोकप्रतिनिधी लक्ष देणार का? 

साताऱ्यात कोणत्याही कितीही मोठ्या ग्राहकाचे बिल एवढे कधीही नाही, त्यामुळे एवढ्या रकमेचे बिल देण्यापूर्वी जीवन प्राधिकरणाला काहीच वाटले नाही का, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. प्राधिकरणाच्या धृतराष्ट्री कारभारामुळे अशाच प्रकारे अनेक नागरिकांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सोसावा लागत आहे. निवडणुकीच्या धामधुमीतून मोकळे झालेले लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणार का, हा खरा मुद्दा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Bill Charged Of 25 Lacs Rupee To Citizen Of Satara