पशुपक्ष्यांच्या तृषाशांतीसाठी सरसावले हात 

पशुपक्ष्यांच्या तृषाशांतीसाठी सरसावले हात 

कोल्हापूर - पारा 38 अंशांवर गेला आहे. दिवसेंदिवस तो आणखी वर जात असल्याने उष्म्यामुळे माणूसच काय तर पशुपक्षीही हैराण झाले आहेत. प्रचंड उष्म्यामुळे पक्ष्यांना प्यायला पाणीही मिळेनासे झाले आहे. त्यांच्यासाठी शहर आणि उपनगरांतील घरांच्या टेरेसवर, गॅलरीत, झाडावर पाणी ठेवून पर्यावरणप्रेमी आपली जबाबदारी पार पाडत आहेत. प्रामुख्याने यामध्ये मुलांचा आणि वयोवृद्धांचा वाटा मोठा आहे. केवळ काहींनीच पक्ष्यांना पाण्याची सोय करून उपयोग नाही, त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. 

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. आता तर पारा 38 अंशांपेक्षाही पुढे गेला आहे. वातावरणात सकाळी आणि रात्री गारवा जाणवत असला तरी दिवसभर उन्हाचा तडाखा प्रचंड असतो. शहरात दुपारी चारपर्यंत रस्त्यावरही गर्दी कमी होऊ लागते. वाहनधारक उन्हापासून सुटका व्हावी म्हणून रुमाल, स्कार्फचा वापर करतात. 

प्रचंड उष्म्याच्या पार्श्‍वभूमीवर पक्ष्यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने पक्षी मिळेल तेथे पाणी पिताना दिसतात. अगदी नवीन इमारतींच्या स्लॅबवर साठवलेल्या पाण्यात डुबकी मारून गारवा मिळवण्याचा प्रयत्न करतात. पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी सोशल मीडियातूनही आवाहन केले जात आहे. पशु-पक्ष्यांबद्दल आस्था असणारे जागा मिळेल तेथे पाण्याची सोय करत आहेत. स्लॅबवर, गच्चीत, अंगणात, झाडावर पाण्याची सोय केली आहे. धान्यासह अन्य खाद्यपदार्थ आणि जोडीला पाण्याची सोय केली जात आहे. पाणी जास्त असेल तर चिमणी, सोळंकी, भारद्वाज असे पक्षी तेथे पाणी पितात. जास्त पाणी असेल तर एखादी डुबकीही मारतात. ज्या ठिकाणी पाण्याची सोय केली आहे तेथे पक्षी हमखास येऊन आपली तृष्णा भागवताना दिसतात. 

सर्वांचाच हातभार हवा 
पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात लहान मुलांबरोबरच वयोवृद्धही आघाडीवर आहेत. वेळ मिळेल तेव्हा पाण्याचे भांडे स्वच्छ करून त्यात थंड पाणी घातले जात आहे. पक्ष्यांना काही तरी खायला मिळावे म्हणून खाद्यपदार्थही ठेवले जातात. शहराच्या अनेक भागांत तसेच उपनगरांत अधिक प्रमाणात पक्ष्यांना पाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अगदी शक्कल लढवून पाणी आणि खाद्यपदार्थ ठेवले आहेत. पाण्यासाठी पक्ष्यांची सोय प्रत्येकाने करण्याची गरज आहे. काही मोजक्‍या लोकांनी अशी उपाययोजना न करता प्रत्येकानेच हातभार लावला तर पाण्यासाठी पक्ष्यांना वणवण भटकण्याची वेळ येणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com