तुम्ही पक्ष्यांसाठी पाणी ठेवलंय ना? 

परशुराम कोकणे
सोमवार, 15 एप्रिल 2019

गेल्या चार वर्षांपासून आम्ही घराच्या परिसरात पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवत आहोत. विविध पक्ष्यांसोबत खारुताईसुद्धा पाणी पिण्यासाठी येते. यातून एक वेगळं समाधान मिळतं. स्टीलची भांडी किंवा प्लास्टिकच्या डब्यात पाणी ठेवू नये. उष्ण वातावरणामुळे पाणी गरम होते. खापराच्या भांड्यात पाणी थंड राहते. 
- शिवानी गोटे, पर्यावरणप्रेमी 

सोलापूर : तापमान 43 अंशांपर्यंत पोचल्याने माणसासह प्रत्येक जीव हैराण झाला आहे. म्हणूनच घराच्या अंगणात, गच्चीवर पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. 

उन्हाळ्यात ठराविक वेळेनंतर थंड पाणी पिऊन आपण स्वत:ला उन्हापासून वाचविण्याचा प्रयत्न करतोय, असंच काहीसं पक्ष्यांचंही आहे. पक्ष्यांनाही पाण्याची आवश्‍यकता आहे. पाण्याअभावी अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. निसर्ग जपण्यासाठी पक्ष्यांनाही वाचविले पाहिजे. पक्ष्यांसाठी पाणी स्टीलच्या भांड्यात किंवा प्लास्टिकच्या डब्यात न ठेवता मातीच्या भांड्यात ठेवायला हवे. सोलापुरात अनेक पक्षीप्रेमी संस्था, संघटना पक्ष्यांसाठी घराच्या अंगणात, गच्चीवर पाणी ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. बसवराज बिराजदार, कृष्णा जाधव, विनय गोटे आदी पर्यावरणप्रेमी मंडळी पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठीची भांडी लोकांना देत असतात. कुंभारांकडे पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठीची मातीची भांडी सहज मिळतात, असे पर्यावरणप्रेमी कृष्णा जाधव यांनी सांगितले. 

गेल्या चार वर्षांपासून आम्ही घराच्या परिसरात पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवत आहोत. विविध पक्ष्यांसोबत खारुताईसुद्धा पाणी पिण्यासाठी येते. यातून एक वेगळं समाधान मिळतं. स्टीलची भांडी किंवा प्लास्टिकच्या डब्यात पाणी ठेवू नये. उष्ण वातावरणामुळे पाणी गरम होते. खापराच्या भांड्यात पाणी थंड राहते. 
- शिवानी गोटे, पर्यावरणप्रेमी 

माझ्या घराच्या टेरेसवर खराब झालेले टीव्हीचे डिश आहे. डिशची दिशा बदलून मी त्यात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. रोज डिशमध्ये नियमित पाणी घालतो. कबुतरे, चिमण्या, बुलबुल, भारद्वाज, कावळा व इतर पक्षी आपली तहान भागविण्यासाठी येतात. 
- राजेंद्र काकडे, शिक्षक

Web Title: water for birds for drought situation