म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कालव्याकाठी ‘पाणी’ संघर्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कालव्याकाठी पाणी संघर्ष जुंपला आहे. सलग पाच महिने ही योजना सुरू होती, त्यानंतर एक महिना खंड पडला. या काळात पाणीपातळी तळाला गेली असून, शेतकरी अडचणीत आल्यामुळे आधी आपल्या गावातील शिवाराला पाणी मिळावे, यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कालव्याकाठी पाणी संघर्ष जुंपला आहे. सलग पाच महिने ही योजना सुरू होती, त्यानंतर एक महिना खंड पडला. या काळात पाणीपातळी तळाला गेली असून, शेतकरी अडचणीत आल्यामुळे आधी आपल्या गावातील शिवाराला पाणी मिळावे, यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, ही योजना पाऊस सुरू होईपर्यंत सुरू ठेवली जाणार आहे, शेतकऱ्यांनी संयमाने घ्यावे, गावांनी एकमेकांना विश्‍वासात घेऊन पाण्याचे नियोजन करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. अर्थात, मिरज पूर्व भागातील शेतकरी या घडीला तरी कुणाचे ऐकण्याच्या स्थितीत नाहीत.

कळंबी कालव्यावर बेडगपासून मालगावपर्यंत ठिकठिकाणी पाणी अडवण्याचे, पोटकालवे खुले करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यातून टाकळी, मल्लेवाडी, एरंडोली, मालगाव येथील शेतकऱ्यांमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आहे. 

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे बेडग, आरग, कळंबी, लिंगनूर, खंडेराजुरी, सलगरे (मुख्य), सलगरे शाखा, कवठेमहांकाळ दोन्ही योजना सध्या सुरू करण्यात  आल्या आहेत. त्यातून मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळच्या लाभक्षेत्रात पाणी पोचले आहे.

छोट्या योजनांत डोंगरवाडी, बनेवाडी, मूळ गव्हाण व विस्तारीत गव्हाण योजना सुरू केले आहेत. दररोज ९०० क्‍यूसकने पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. एकावेळी ७५ ते ८० पंप सुरू केले जात आहेत. ते वाढवण्याची पाटबंधारे विभागाची तयारी आहे, मात्र सध्या शेतीला पाण्याची नितांत गरज आहे. 

एकीकडे ऊस तुटला आहे, तो फोडून घेतल्यानंतर पाटाने पाणी देणे गरजेचे आहे. उन्हामुळे जमिनी पूर्ण वाळून गेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला द्राक्षाची एप्रिल छाटणी गतीने सुरू आहे. त्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. सध्या विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे. द्राक्षाचे पीक संकटात आहे. आठवड्यात पाणी मिळाले नाही तर बागांना कोंब येणार नाहीत, अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे. 

या स्थितीत शक्‍य तितक्‍या लवकर योजनेचे पाणी शिवारात नेण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मुख्य कालव्यावरील पोटकालव्यांतून पाणी वळवले जात आहे. तो पुन्हा पळवू नये, यासाठी जागता पहारा दिला जात आहे.  मुख्य कालव्यावरील शेतकरी याविरुद्ध आक्रमक झाले आहेत. विशेषतः कळंबी कालव्यावर हा प्रकार सातत्याने घडतो आहे.  

म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळणार आहे. योजना पाऊस सुरू होईपर्यंत चालू ठेवण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांनी संयमाने घ्यावे. कुठेही वाद नकोत. पाटबंधारे अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. पाणी कमी पडणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतोय. आवर्तनाचे नियोजन काटेकोर केले आहे.
-सूर्यकांत नलवडे, 

कार्यकारी अभियंता.

Web Title: Water conflict at the canal of Mhaisal irrigation project