वडगाव गुप्ता शिवारात जलसमृद्धी

चंद्रभान झरेकर 
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

ग्रामस्थ एकत्र येऊन विकासकामे करतात. वडगाव गुप्ता गावातील अनेक कामे लोकवर्गणीतून झाली. वाड्या-वस्त्यांवर मुरमीकरण, 30 लाखांचा बंधारा, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, गावात घंटागाडी सुरू केली.

नगर : वडगाव गुप्ता (ता. नगर) शिवारातील सीना नदीची खोली व रुंदीकरण भारत फोर्ज कंपनी व लोकवर्गणीतून करण्यात आले. त्यामध्ये बंधारे बांधून त्यात 84 कोटी लिटर पाणी अडविले. त्यामुळे शिवारातील विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ झाली, अशी माहिती सरपंच विजय शेवाळे यांनी दिली.

wadgaon gupta sina river

वडगाव गुप्ता (ता. नगर) : सीना नदीचे टिपलेले नयनरम्य दृश्‍य.

वडगाव गुप्ता येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ते बोलत होते. पंधराव्या वित्त आयोगासाठी विविध विषयांवर चर्चा झाली. आपला गाव आपला विकास, पंधराव्या वित्त आयोगाबाबत विकास आराखडा, पाच वर्षांतील विकासकामांची माहिती दिली. मागासवर्गीयांच्या लोकसंख्येनुसार व गावचा नकाशा काढून ग्रामस्थांच्या गरजा समजून घेत चर्चा झाली. गावातील वंचित घटकांसाठीही चर्चा झाली. बालकांचे आरोग्य, शिक्षणाविषयी चर्चा करून पंधराव्या वित्त आयोगासाठी प्रस्ताव घेण्यात आले. वॉटर बजेट तयार केले. ओल्या दुष्काळाचेही पंचनामे झाले आहेत.

हेही वाचा शिवसेनेच्या पोस्टरवर झळकले "राष्ट्रवादी'चे आमदार  

लोकसहभागातून विकासकामे

सरपंच शेवाळे म्हणाले, की ग्रामस्थ एकत्र येऊन विकासकामे करतात. गावातील अनेक कामे लोकवर्गणीतून झाली. वाड्या-वस्त्यांवर मुरमीकरण, 30 लाखांचा बंधारा, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, गावात घंटागाडी सुरू केली. जुन्या गटारांची दुरुस्ती, तसेच नवीन गटारांची कामे केली. शिवारातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. वाड्या-वस्त्यांवर नवीन वीज रोहित्र टाकून अनेकांना वीजजोड दिले. गावातील घनकचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावला. सौरदिवे लावून गाव सुशोभित केले. येथील स्मशानभूमीचेही चांगले काम केले. 

हेही वाचा उसाला देणार "ते' अडिच हजारांचा भाव 

हजारांहून अधिक वृक्षलागवड

ग्रामपंचायतही गावात विविध विकासकामे सुरू आहेत. येथील शाळेस बाक, टेबल, खुर्च्या, शौचालय, गार्डन तयार करून दिली. तसेच गावच्या शिवारातील एक हजारांपेक्षा अधिक वृक्ष जगविली, तसेच अजूनही वृक्षारोपण सुरू आहे. एक्‍साईड कंपनी, नगर दक्षिणची जनकल्याण समिती व श्रीश्री रविशंकर संस्थेचाही गावाच्या विकासात हातभार आहे. 

डिजिटल ग्रामपंचायत गरजेची

सरकारच्या धोरणानुसार आज प्रत्येक ग्रामपंचायत डिजिटल होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत स्थानिक पातळीवर विविध विकासकामे करते. ही सर्व कामे ग्रामस्थांना कळल्यास सर्व एकत्र येऊ शकतात. तसे झाले तर गावपातळीवर आणखी जास्त कामे होतील. डिजिटल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक समस्यांचा निपटारा करता येतो. शिवाय ग्रामपंचायतीचा कारभारही पारदर्शी होतो. डिजिटल ग्रामपंचायतीचा सर्वाधिक फायदा ग्रामस्थांना होतो. 
- विजय शेवाळे, सरपंच, वडगाव गुप्ता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water conservation in Wadgaon Gupta