कोंडी गावात महाश्रमदानाचा तुफान! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

अभिनेते जितेंद्र जोशी, डॉ. पोळ यांचाही सहभाग 
पाणी फाउंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पोळ, डॉ. नामदेव ननवरे, तालुका समन्वयक विकास गायकवाड यांनी भोगाव, हिरज, कोंडी, गुळवंची, वडाळा, पडसाळी या गावांमध्ये भेटी देऊन श्रमदान करणाऱ्यांना प्रोत्साहित केले. अभिनेता जितेंद्र जोशी हे बुलेटवरून गुळवंची गावात आले. श्रमदान आणि प्रबोधनही केले.

सोलापूर : रविवारची सकाळ.., हातात कुदळ अन्‌ खोऱ्या.., दीड फुटाच्या खड्ड्याचे उदिष्ट.., तीन वर्षाच्या चिमुकलीपासून सत्तर वर्षाच्या आजोबांपर्यंत हजारोंचा सहभाग.., घामाने भिजलेले अंग.., तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी देणारे विद्यार्थी.., दोन तासात माळरानावर झालेले शेकडो खड्डे.., शेवटी साऱ्यांनीच उपीटावर मारलेला ताव.. हे वर्णन आहे उत्तर सोलापूर तालुक्‍यातील कोंडी गावातील. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या कोंडी गावात महाश्रमदानाची मोहीम राबविण्यात आली. 

कोंडीच्या माळरानावर सकाळी आठच्या सुमारास जमलेल्या जलप्रेमींनी आधी नाव नोंदणी केली. टाळ्या वाजवत, काल्पनिक फुलांचा वर्षाव करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. जलकन्या भक्ती जाधव यांनी माणुसकीची प्रार्थना घेऊन साऱ्यांना श्रमदानासाठी प्रोत्साहन दिले. हातात कुदळ आणि खोऱ्या घेऊन दहा-दहा जणांचा समूह करण्यात आला होता. ठरवून दिलेल्या जागेवर खड्डा मारायला सुरवात झाली. थोडं-थोडं करून साऱ्यांनीच खोदकाम आणि माती काढून बाजूला टाकण्याचे श्रमदान केले. पाणी फाउंडेशनच्या तांत्रिक मार्गदर्शकांनी पाहणी करत प्रोत्साहनही दिले. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र उशीरे यांची कन्या प्राजक्ता हिने श्रमदानाने वाढदिवस साजरा केला. 

गावकऱ्यासंह पाणी फाउंडेशनचे सदस्य प्रकाश भोसले, उपसरपंच श्री. काकडे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, जिल्हा परिषद सदस्य अप्पाराव कोरे, पर्यावरणप्रेमी भरत छेडा, मुकुंद शेटे, शिवाजी पवार, महादेव गोटे, पप्पू जमादार, संतोष धाकपाडे, डॉ. वैशाली अगावणे, ऍड. सरोज बच्चुवार, वसुंधरा शर्मा, शिवाई शेळके, अभिंजली जाधव, स्वाती भोसले, चेतन लिगाडे, सतीश तमशेट्टी, रणजित शेळके, बसवराज बिराजदार, रेवण कोळी, अमोल मोहिते, बसवराज जमखंडी, गणेश बिराजदार, विकास शिंदे, तिप्पया हिरेमठ, बसवराज परांडकर, विनय गोटे, स्वप्नील धाकपाडे, वर्षा कमलापुरे, समृद्धी भोसले, अब्दूलकादर मुजावर, मयूर गवते, प्रा. संगमेश्‍वर बाड, अजित चौहान, तरुण जोशी, साहेबराव परबत, प्रसाद मोहिते, अनु मोहिते आदी महाश्रमदानात सहभागी झाले होते. 

पानी फाउंडेशन नेमक्‍या कोणत्या तंत्रानं काम करतं? माथा ते पायथा संकल्पना काय आहे? पावसाचं पाणी अडविण्यासाठी, जमिनीत मुरविण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धत कोणती? जलसंवर्धनासाठी आपण कोणत्या प्रकारे योगदान देऊ शकतो याविषयी माहिती महाश्रमदानात सहभागी होऊन मिळाली. रविवारी सुट्टीचा दिवस सत्कारणी लागल्याचा समाधान वाटते. 
- रामचंद्र वाघमारे, सारथी युथ फौंडेशन 

अभिनेते जितेंद्र जोशी, डॉ. पोळ यांचाही सहभाग 
पाणी फाउंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पोळ, डॉ. नामदेव ननवरे, तालुका समन्वयक विकास गायकवाड यांनी भोगाव, हिरज, कोंडी, गुळवंची, वडाळा, पडसाळी या गावांमध्ये भेटी देऊन श्रमदान करणाऱ्यांना प्रोत्साहित केले. अभिनेता जितेंद्र जोशी हे बुलेटवरून गुळवंची गावात आले. श्रमदान आणि प्रबोधनही केले.

Web Title: water cup compitition in Solapur