वितरण व्यवस्था नाही, हेच खरं दुखणं!

Water
Water

सातारा - जिल्ह्यात असलेल्या विविध सिंचन प्रकल्पांतून १५१.९० टीएमसी पाणीसाठा होतो. यापैकी २२.२० टीएमसी पाणी सांगलीला, तर ५.७५ टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्याला असे फक्त २७.९५ टीएमसी पाणी जिल्ह्याबाहेर जाते.

उर्वरित पाणी त्या-त्या प्रकल्पांतर्गत असलेले कालवे व नदीपात्रात सोडले जाते. बाहेर जाणारे पाणी वगळता जिल्ह्यात १२३.९५ टीएमसी पाणी शिल्लक असून, केवळ वितरण व्यवस्था नसल्याने दुष्काळी जनतेपर्यंत व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हे पाणी आजपर्यंत पोचू शकलेले नाही. ही वितरण व्यवस्था निर्माण करण्यासाठी खरे तर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची आवश्‍यकता असताना पाणीप्रश्‍नाचे राजकारण करण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात इतक्‍या मोठ्या प्रमाणात हक्काचे पाणी असूनही दुष्काळाचा डाग पुसला जात नाही.

जिल्ह्यात तब्बल २४ सिंचन प्रकल्प आहेत. यामध्ये मोठे चार, मध्यम पाच, उपसा सिंचन योजना सहा आणि तब्बल दहा लघुपाटबंधारे प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांतून एकूण १५१.९० टीएमसी पाणीसाठा होतो. यापैकी कोयना, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, कृष्णा खोडशी बंधाऱ्यातून सोलापूर व सांगली जिल्ह्याला पाणी दिले जात आहे. आपल्या जिल्ह्यात सर्व प्रकल्पांच्या कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. ज्या ठिकाणी कालव्यांची कामे पूर्ण आहेत, तेथे वितरण व्यवस्थेची कामे झालेली नाहीत. त्यामुळे धरणे झाली आणि पाणी साठले म्हणजे दुष्काळी भागाला पाणी मिळाले, असे म्हणता येणार नाही. माण तालुक्‍यात अलीकडच्या काळात कालव्यातून सोडलेल्या पाण्याचे राजकारण सुरू आहे. प्रत्येकजण माण तालुक्‍यात आलेले पाणी आपल्यामुळेच आले असे सांगत आहे. मुळात जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात जाणाऱ्या पाण्याकडे प्रत्येकजण सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. कारण आपल्याकडे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचण्याची यंत्रणाच उपलब्ध नाही. ही यंत्रणा उभारली जावी, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून म्हणावे तेवढे प्रयत्न होत नाहीत. उलट बाहेर जाणाऱ्या पाण्यावरूनच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यावर सर्वांनी भर दिला आहे. 

कोयना जलविद्युत प्रकल्पातून सांगली जिल्ह्याला १६.३७ टीएमसी, सोलापूर जिल्ह्यात साडेपाच टीएमसी, टेंभू प्रकल्पातून ०.१६ टीएमसी पाणी सातारा जिल्ह्याला दिले जाते. उर्वरित पाणी हे जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते. तसेच कोयना, कृष्णा नदीतून सोडलेले पाणी सांगली जिल्ह्याला जाते. 

धोम प्रकल्पाची क्षमता ११.६९ टीएमसी असून, यातून वाई, जावळी, सातारा व कोरेगाव तालुक्‍यांना कालव्याव्दारे पाणी दिले जाते. 

धोम-बलकवडी प्रकल्प ३.९६ टीएमसीचा असून, यातून पुणे जिल्ह्यातील भोर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्‍याला पाणी दिले जाते. यातील ३.४८ टीएमसी पाणी साताऱ्याला, तर ०.१५ टीएमसी पाणी पुणे जिल्ह्याला दिले जाते. कण्हेर धरणाची क्षमता ९.५९ टीएमसी असून, यातून सातारा, कोरेगाव व कऱ्हाड तालुक्‍यांना कालव्याव्दारे पाणी दिले जाते. तसेच खानापूर, तासगाव, कडेपूर या सांगली जिल्ह्यातील तालुक्‍यांना पाणी दिले जाते. यातील ५.७७ टीएमसी पाणी सातारा जिल्ह्याला, तर ३.८२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यात जाते. 

सातारा तालुक्‍यातील उरमोडी प्रकल्प ९.६५ टीएमसी क्षमतेचा असून, यातील सर्व पाणी सातारा, खटाव व माण या तालुक्‍यांसाठी राखीव असते. पण, कण्हेर कालव्यातून या प्रकल्पाचे पाणी काही प्रमाणात सांगलीला सोडले जाते. याची माहिती पाटबंधारे विभागाकडे उपलब्ध नाही. 

तारळी धरणाची क्षमता ५.८४ टीएमसी असून, यातील ५.०३ टीएमसी पाणी सातारा जिल्ह्याला, तर ०.८१ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला दिले जाते.  कृष्णा कालवा (खोडशी बंधारा) यात एकूण २.७० टीएमसी पाणीसाठा होतो. त्यापैकी १.५० टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यासाठी तर १.२० टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला दिले जाते. उर्वरित ११ प्रकल्पांचे पाणी हे खटाव, माण, वाई, पाटण, जावळी तालुक्‍यांतील सिंचनासाठी व म्हसवड येथील बंधाऱ्याचे ०.२८ टीएमसी पाणी सांगोल्याला (सोलापूर जिल्हा) दिले जाते.

...काय आहे नीरा-देवघर प्रकल्प
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्‍यातील नीरा नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणातून डावा व उजव्या कालव्याद्वारे भोर, खंडाळा, फलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्‍यांना पाणी दिले जाते. २००८ मध्ये या धरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असून, यावर बेनवडी, गावडेवाडी, शेखमिरवाडी व वाघोशी या चार उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी दिले जाणार आहे. या योजनांची कामे पूर्ण झाली असली तरी जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार वितरण व्यवस्था कालव्याऐवजी बंद नलिकेव्दारे करण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. नीरा उजवा कालव्याचे काम पूर्ण झाले असून, लघु वितरकांच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. नीरा-देवघर धरणातून पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्‍यातील ३४ गावे, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्‍यातील ४९, फलटण तालुक्‍यातील ५९ गावे तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्‍यातील १६ गावे अशी एकूण १५८ गावांना लाभ मिळणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून एप्रिल २०१९ अखेर सात हजार ५३६ हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. नीरा-देवघरचे कालवे अपूर्ण असल्याने या धरणाचे पाणी अनेक वर्षांपासून वीर धरणातून धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना सोडण्यात येत होते. मात्र, २०१७ पासून नीरा-देवघर धरणाच्या अर्धवट असलेल्या कालव्यातून या धरणातील काही पाणी खंडाळा तालुक्‍यातील वाघोशी या गावापर्यंत सोडण्यात येत होते. वीर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे ५७ टक्के तर डाव्या कालव्याव्दारे ४३ टक्के पाणी वाटपाचे धोरण १९५४ मध्ये कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार वीर धरणाच्या उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्‍यांना मिळत होते. वीरच्या डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्‍याला पाणी दिले होते. वीर धरणातून ६० टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूरला व ४० टक्के पाणी उजव्या कालव्यातून खंडाळा, फलटण आणि माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्‍याला देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय दुष्काळी भागावर अन्याय करणारा होता. हा करार एप्रिल २०१७ पर्यंत होता. या कराराव्दारे दुष्काळी तालुक्‍यांचे हक्काचे पाणी बारामती, इंदापूरला पळविले जात असताना खंडाळा, फलटण व माळशिरस, सांगोला व पंढरपूर या दुष्काळी भागातील एकाही नेत्याने या कराराला विरोध केला नव्हता. नीरा-देवघरच्या रखडलेल्या कालव्याच्या कामांबाबत आवाज उठल्यामुळे आता या भागातील जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com