श्रेयवादाच्या पाण्याचे वीजबिल थकले 

उमेश बांबरे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

सातारा - माण तालुक्‍यात मागील काही महिन्यांमध्ये उरमोडीचे पाणी उचलून देण्यात आले. त्यासाठी वापरलेल्या विजेचे पाच कोटी रुपयांचे वीजबिल थकले आहे. ते भरायचे कोणी, असा प्रश्‍न उरमोडी पाटबंधारे विभागाला पडला आहे. माण तालुक्‍यातील लोकांकडून पाणीपट्टीच्या स्वरूपात पैसे उपलब्ध केले जाणार होते; पण पाणीपट्टी मागायची कोणाकडे, असा प्रश्‍न आहे. महसूल विभागाने याबाबत कानावर हात ठेवले आहेत. 

सातारा - माण तालुक्‍यात मागील काही महिन्यांमध्ये उरमोडीचे पाणी उचलून देण्यात आले. त्यासाठी वापरलेल्या विजेचे पाच कोटी रुपयांचे वीजबिल थकले आहे. ते भरायचे कोणी, असा प्रश्‍न उरमोडी पाटबंधारे विभागाला पडला आहे. माण तालुक्‍यातील लोकांकडून पाणीपट्टीच्या स्वरूपात पैसे उपलब्ध केले जाणार होते; पण पाणीपट्टी मागायची कोणाकडे, असा प्रश्‍न आहे. महसूल विभागाने याबाबत कानावर हात ठेवले आहेत. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

माण तालुक्‍यात या वर्षी पाऊसच झाला नाही. त्यामुळे उरमोडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी येथील लोकप्रतिनिधी व जनतेने केली होती. त्यानुसार म्हसवड, राजेवाडी तलावात उरमोडीतून पाणी सोडण्यात आले. उरमोडीचे पाणी माण तालुक्‍यात आल्यावर येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी हे पाणी कोणामुळे आले, याचा श्रेयवाद सुरू केला. यातून जलपूजनेही झाली. ज्या ठिकाणी कालव्याची सोय नाही तेथे ओढे, नाले तलावात उरमोडीचे पाणी सोडण्यात आले. ज्या वेळी हे पाणी सोडण्यात आले, त्या वेळी दुष्काळ जाहीर झालेला नव्हता; पण पाण्याची पिकांसह पिण्यासाठी आवश्‍यकता असल्याने लोकाग्रहामुळे उरमोडी पाटबंधारे विभागाने पाणी सोडले. त्यासाठी पाणी उचलून द्यावे लागले. त्यासाठी वापरलेल्या विजेपोटी पाच कोटी रुपयांचे वीजबिल आले आहे. ते भरायचे कसे? असा प्रश्‍न पाटबंधारे विभागापुढे आहे. मुळात उरमोडीच्या पाण्यावर पाणीपट्टी आकारून यातून वीजबिल भरण्यात येणार होते; पण पाणीपट्टी मागायची कोणाकडे, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. त्यातच आता माण तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाटबंधारे विभागाची अडचण झाली आहे. पाणीपट्टीतून थकित रकमेच्या 19 टक्के रक्कम जमा करून ती वीजबिलापोटी भरल्यास उर्वरित रक्कम कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मिळण्याची शक्‍यता आहे; पण ही 19 टक्के रक्कम पाणीपट्टीच्या स्वरूपात वसूल करण्याचीच मोठी अडचण आहे. महसूल विभागाने याबाबत हात वर केले आहेत. उलट आम्ही सांगितल्याशिवाय पाणी सोडायचे नाही, अन्यथा विजेचे बिल मिळणार नाही, असा दम महसूल विभागाने पाटबंधारे विभागाला दिला आहे. त्यामुळे उरमोडी विभागाची अडचण झाली आहे. आता पाणीपट्टीच्या स्वरूपात माण तालुक्‍यातून एकूण थकित वीजबिलाच्या 19 टक्के रक्कम जमा करण्याचे आव्हान आहे. 

दुष्काळामुळे कारवाई थांबली 
उरमोडी धरणाचे पाणी उचलून देण्यासाठी वापरलेल्या विजेची थकबाकी मिळत नसल्याने वीज वितरण कंपनीने मध्यंतरी कोंबडवाडी पंप हाऊसचे वीज कनेक्‍शन तोडण्याचा प्रयत्न केला; पण दुष्काळी परिस्थिती जाहीर असल्याने वीज भरण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे सांगून ही कारवाई थांबविण्यात आली होती. आता वीजबिल भरायचे कसे, असा प्रश्‍न पाटबंधारे विभागापुढे आहे. 

वीजबिलासाठी श्रेयवाद होणार? 
उरमोडीचे पाणी माण तालुक्‍यात आल्यावर येथील प्रत्येक लोकप्रतिनिधीने जलपूजन करून हे पाणी आपल्यामुळेच कसे आले यातून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला; पण आता थकलेले वीजबिल भरण्यासाठी या नेतेमंडळींना शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. येथे सत्ताधारी व विरोधकही सक्षम आहेत. त्यामुळे पाणी आणण्याबरोबर पाण्यासाठी वापरलेल्या वीजबिलाचेही श्रेयही त्यांनाच घ्यावे लागणार आहे. 

Web Title: water electricity bill stop in Maan taluka