होरपळणाऱ्या झाडांसाठी गडप्रेमींची धडपड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

सदाशिवगडावरील वृक्षसंपदेला बाटलीने पाणी; पर्यावरण संवर्धनाचा कृतिशील प्रयत्न

कऱ्हाड - ऐन उन्हाळ्यात सदाशिवगडावरील झाडांना जगवण्यासाठी दर वर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईची झळ बसत आहे. उन्हाळ्यात पाण्याविना झाडे होरपळून जाण्याची भीती असताना पर्यावरण, तसेच गडप्रेमींनी त्यासाठी पुढाकार घेत गडाखालून कॅन, बाटलीद्वारे पाणी नेऊन झाडांना जीवदान देण्याची परंपरा याही वर्षी सुरू ठेवली आहे. 

सदाशिवगडावरील वृक्षसंपदेला बाटलीने पाणी; पर्यावरण संवर्धनाचा कृतिशील प्रयत्न

कऱ्हाड - ऐन उन्हाळ्यात सदाशिवगडावरील झाडांना जगवण्यासाठी दर वर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईची झळ बसत आहे. उन्हाळ्यात पाण्याविना झाडे होरपळून जाण्याची भीती असताना पर्यावरण, तसेच गडप्रेमींनी त्यासाठी पुढाकार घेत गडाखालून कॅन, बाटलीद्वारे पाणी नेऊन झाडांना जीवदान देण्याची परंपरा याही वर्षी सुरू ठेवली आहे. 

शहरालगतच्या सदाशिव गडावर, दररोज तसेच शनिवार, रविवार, सोमवार व मंगळवारी देवदर्शन, तसेच फिरायला जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ. योगेश कुंभार व त्यांचे सहकारी गडसंवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. पावसाळ्यात दर वर्षी वृक्षारोपण होते. परिसरातील जनावरे गडावर चरायला सोडली जात असल्याने वृक्षारोपण केलेल्या झाडांचे नुकसान होत असल्याने सुरवातीला झाडांचे संवर्धन करणे अडचणीचे जात होते. पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी गडावरील झाडांचे संगोपन व्हावे यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून देत तारेच्या संरक्षक कुंपनाची व्यवस्था केली. उर्वरित ठिकाणी गडप्रेमी, पर्यावरणप्रेमींनी लोकवर्गणीतून कुंपन उभारण्यात आले. त्यानंतर जनावरांपासून झाडांचे रक्षण होऊन संवर्धन शक्‍य झाले. 

पावसाळ्यात गडावरील दोन्ही विहिरी पाण्याने भरल्यावर काही दिवस झाडांना पाण्याची चिंता राहात नाही. प्रतिष्ठानचे डॉ. कुंभार यांच्यासह त्यांचे सहकारी, शिवप्रेमी व गडप्रेमी डॉ. सुभाष एरम, रश्‍मी एरम, नरेंद्र मुळीक, डॉ. शेडगे, विजय मुंढेकर, ॲड. वसंतराव मोहिते, आबासाहेब लोकरे, सचिन आजेटराव, दीपक अरबुणे यांच्यासह अनेक जण झाडांना पाणी देण्याबरोबरच त्याच्या संवर्धनाकडे लक्ष देतात. मात्र, उन्हाच्या झळा लागल्यावर गडावरील पाण्याची अवस्था बिकट होते. त्यामुळे झाडे जगवणे अवघड होत आहे. 

गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यावरण व गडप्रेमींनी पहाटे गडावर जाताना रिकाम्या हाताने न जात पाण्याने भरलेली बाटली, कॅन नेण्याची प्रथा सुरू ठेवली आहे. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठाननेही गडाच्या पायथ्याला पहाटे कॅन, बाटल्या पाण्याने भरून ठेवणे सुरू केले. त्यामुळे गडावर रिकाम्या हाताने जाण्यापेक्षा अनेक जण कॅन, बाटल्या घेऊन जातात. सहाजिकच कॅन व बाटल्याद्वारे पाणी देऊन झाडे जगवण्याची धडपड सुरू आहे. 

पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था हवी...
गडावर कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्यासाठी खर्चही मोठा आहे. मात्र, सदाशिवगडाला तीर्थक्षेत्र क वर्ग दर्जा मिळाल्यास त्याद्वारे निधी प्राप्त होऊन पाणी आणणे शक्‍य आहे. त्याशिवाय जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध झाल्यास गडाच्या पायथ्याखालून गेलेल्या टेंभू योजनेचे पाणी उचलणे शक्‍य असल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: water gives to tree on hill