दख्खनचा राजा श्री जोतिबासह तीन मंदिरात गळती (व्हिडिओ)

निवास मोटे
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

जोतिबा डोंगर - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्री क्षेत्र जोतिबा डोंगर तथा वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर, आदिमाया चोपडाई देवी मंदिर, श्री महादेव मंदिरात यंदा पावसामुळे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.

जोतिबा डोंगर - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्री क्षेत्र जोतिबा डोंगर तथा वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर, आदिमाया चोपडाई देवी मंदिर, श्री महादेव मंदिरात यंदा पावसामुळे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.

वास्तुविशारदाकडून तिन्ही मंदिरांची पाहणी करून पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व प्रशासनाने गळती बंद करण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. डोंगरावर नेहमी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यामुळे जोतिबा मंदिरावरच्या शिखरावरील सज्जावर सतत पावसाचे पाणी साठत राहते. ते पूर्णपणे बाहेर पडत नाही. सज्जावरील कोब्यास काही ठिकाणी तडे गेले आहेत. त्या ठिकाणाहून हे पाणी तिन्ही मंदिरात येते. शिखराच्या आतमध्ये एक गाभारा असून, त्या ठिकाणी जाण्यासाठी एक छोटी वाट आहे. तेथेही तडे गेल्याने त्यातून मंदिरात पाणी येते.

श्री चोपडाई मंदिरातील डावीकडील सज्जाच्या बाजूवरून हे पाणी मंदिरात थिबकते. जेथे भाविक रांगेतून दर्शन घेतात तेथे त्यांच्या अंगावर हे पाणी पडते. जोतिबाच्या मुख्य मंदिरात तर ज्या ठिकाणी भाविक नतमस्तक होतात तेथे त्यांच्या डोक्‍यावर पाणी थिबकते. शेजारच्या गणपती मारुती या लहान मंदिराच्या कोपऱ्यात पाणी पाझरते. बद्रिकेदार व महादेव मंदिरातही हे पाणी थिबकते. ते भाविकांच्या अंगावर पडते. मंदिरातील ही गळती रोखण्यासाठी पुजाऱ्यांनी ठिकठिकाणी प्लास्टिकचे कागद बांधले आहेत. मंदिरांच्या भिंतीवर पाणी पाझरत असल्याने विजेचा धक्का बसण्याची तसेच शॉटसर्किट होण्याची शक्‍यता आहे.

दहा वर्षापूर्वी मंदिरातील सज्जावर सर्वत्र चुन्याचा कोबा केला होता. तो फोडून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटचा कोबा टाकला आहे. सात-आठ वर्षांपासून अशी गळती सुरू झाल्याचे ग्रामस्थ पुजाऱ्यांनी सांगितले. गळती रोखण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने लक्ष देऊन काही उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे काही भाविकांनी सांगितले. दरम्यान, काल पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, सचिव विजय पोवार, अधीक्षक महादेव दिंडे, कर्मचाऱ्यांनी पाहणी करून उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

डोंगरावर यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तिन्ही मंदिरांत गळती लागली आहे. पावसाने उघडीप दिल्यावर गळती काढली जाणार आहेत. देवस्थान समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याची पाहणी केली.
- महादेव दिंडे,
अधीक्षक, देवस्थान समिती जोतिबा डोंगर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water leakage in Jotiba Temple