पाच तालुक्‍यांत भूजल पातळीत घट

संजय शिंदे
शनिवार, 13 एप्रिल 2019

हवा भूजल अधिनियमाचा वापर
महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यासच भूजलाची शाश्‍वतता टिकविणे शक्‍य आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्‍यक आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची आहे. टंचाईला तोंड देण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे उद्‌भव संरक्षित करण्यासाठी ग्रामपंचायतींनी अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोर करण्याची आवश्‍यकता आहे.

सातारा - वाढत्या तापमानामुळे अंगाची काहिली होत असतानाच जिल्ह्यात आता पाणीटंचाईचे संकटही घोंगावत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यातील भूजल पातळीत पाच तालुक्‍यांत घट झाली आहे.

भूजल पातळीत झालेली घट अडीच मीटरपर्यंत आहे. तळपत्या सूर्यामुळे तापमान वाढून भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे आतापासूनच योग्य नियोजनाद्वारे पिण्याचे पाण्याचे उद्‌भव संरक्षित करण्याची जरुरी आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यात ५० पाणलोट क्षेत्रात १०६ निरीक्षण विहिरी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यांच्या पाणीपातळीची मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात पाहणी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील माण, फलटण, खटाव, खंडाळा व महाबळेश्‍वर तालुक्‍यांत भूजल पातळीत घट झाल्याचे स्पष्ट  झाले आहे. एकूण १०६ निरीक्षण विहिरींपैकी ६० विहिरींमध्ये पाणीपातळी घटली आहे. भूजलाचा अमर्याद उपसा सुरू राहिल्यास पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाचा मोठा तडाखा बसला आहे.

तापमानाचा पारा वाढला असून, त्याचा परिणाम पाणीपातळी घटण्यात होऊ लागला आहे. सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत झाल्याने पारा चढा राहिला आहे. उन्हाचा तडाखा जाणवताच पाण्याच्या पातळीत घट दिसू लागली आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात माण तालुक्‍यात सर्वात जास्त २.२६ मीटरने पाणीपातळीत घट दिसून येत आहे. फलटण - १.३६, खंडाळा - १.१३, खटाव - ०.८९, महाबळेश्‍वर - ०.७७ मीटरने पाणीपातळी घटली आहे. अन्य तालुक्‍यांत पाणीपातळीत तफावत आढळून आली नसली तरी या तालुक्‍यांतही आगामी काळात टंचाईची शक्‍यता आहे. अनेक गावांत आतापासूनच टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. जलसंधारणाची कामे होऊनही पाऊसच कमी झाल्यामुळे टंचाईची स्थिती जाणवत आहे. 

सतत हवामानात बदल होत असल्याच्या काळात भूजलाचे नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे मत भूजल तज्ज्ञ विलास भोसले यांनी व्यक्त केले.

ऑक्‍टोबरमध्येच नियोजन जरुरीचे
जिल्ह्यात जलसाक्षरतेने मूळ धरले आहे. त्याप्रमाणात जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. राज्याला दिशादर्शक कामे काही गावात झाली आहेत. मात्र, असे असूनही पावसाळा संपल्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये उपलब्ध पाण्याचे नियोजन नसल्यामुळे गावांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. 

Web Title: Water Level Decrease in five tahsil