दहा तलावांतील पाणी पातळी खालावली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

कवठेमहांकाळ - वाढत चाललेला उन्हाळा आणि तालुक्‍यातील दहाही तलावांत खालवत चाललेला पाणीसाठा यामुळे यंदा तालुक्‍यातील पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मात्र म्हैसाळ योजना अजूनपर्यंत सुरू असल्याने काही प्रमाणात टंचाईच्या झळा सुसह्य आहेत. दरम्यान, अकरापैकी सात तलावांची पाणी पातळी खालावली आहे. एक तलाव कोरडा आहे. उर्वरित तीन तलावांतही महिनाभर पुरेलइतके पाणी आहे. दुष्काळाच्या झळा अजून जाणवत नसल्या तरी चार गावांसह 19 वाड्यावस्त्यांवर टॅंकरने पाणी सुरू आहे. 

तालुक्‍यात साठ गावे आहेत. तालुक्‍यात म्हैसाळ व टेंभू योजनांचे पाणी मिळते. अन्य योजना आहेत. तालुक्‍यात अकरा तलाव आहेत. कुची, रायवाडी, लांडगेवाडी, हरोली, दुधेभावी, घोरपडी आणि बसाप्पाचीवाडी या तलावांतील पाणीसाठा खालावला आहे. लंगरपेठचा तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. सध्या नांगोळे, बोरगाव, बंडगरवाडी तलावांत पाणीसाठा आहे. तो महिनाभर पुरेल इतका आहे. त्यात तालुक्‍यातील घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, केरेवाडीस, कोकळे, ढालेवाडीसह 19 वाड्यावस्त्यांवर टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. उन्हाच्या झळा वाढू लागल्या असताना पाणीप्रश्‍न गंभीर रूप धारण करीत आहे. 

दरम्यान, म्हैसाळ योजना यापुढच्या काळात काही महिने सुरू ठेवल्यास काही अंशी टंचाईच्या झळा सुसह्य होणार आहेत. 

तालुक्‍याच्या पूर्व भागातील ढालगाव व रांजणी परिसरातही पाण्यासह चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे गंभीर पाणीप्रश्‍न असे चित्र तीव्र होत आहे. तालुक्‍यात चार गावांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी काही दिवसांत आणखी काही गावांत टॅंकर सुरू करण्याची मागणी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही अशी स्थिती आहे. त्यात वाड्यावस्त्यांवरही पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे. 

तलावांची स्थिती 
सीलखालील - कुची, रायवाडी, लांडगेवाडी, हरोली, दुधेभावी, घोरपडी 
कोरडा - लंगरपेठ 

पाणीसाठा (टक्के) 
1 .नांगोळे -  5.18 
2. बोरगाव -  17.59 
3. बंडगरवाडी - 17.97 

Web Title: water level lowered