पुणे-बंगळूर महामार्ग लवकरच सुरु होणार; पाणी ओसरण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

राजाराम बंधारा पाणीपातळी आज पहाटे 4 वाजता. 51फुट 1 इंच इतकी होती. पातळी 50 फुट होताच एका बाजूने वाहतूक सुरु करण्यात येईल. सर्वांत प्रथम अत्यावश्यक वाहने, खाजगी वाहने, प्रवासी वाहने आणि नंतर अवजड वाहने सोडण्यात येतील. 

कोल्हापूर : तब्बल सात दिवसांनी आज (रविवार) पंचगंगेची पाणीपातळी कमी झाल्याने पुणे-बंगळूर महामार्ग एका बाजूने वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरात पावसान उसंत घेतली असून, पाणीपातळी काही फुटांनी कमी झाली आहे.

कोल्हापूरातील पाणी ओसरण्यास सुरवात झाली असली तरी, शिरोळ तालुक्‍यातील पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. हजारो पूरग्रस्तांपर्यंत पोचताना प्रशासनाची धावपळ उडत आहे.

राजाराम बंधारा पाणीपातळी आज पहाटे 4 वाजता. 51फुट 1 इंच इतकी होती. पातळी 50 फुट होताच एका बाजूने वाहतूक सुरु करण्यात येईल. सर्वांत प्रथम अत्यावश्यक वाहने, खाजगी वाहने, प्रवासी वाहने आणि नंतर अवजड वाहने सोडण्यात येतील. राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वर 30,000 अवजड वाहने थांबून आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास वेळ लागेल. कृपया अत्यंत गरज असल्याशिवाय लगेच महामार्गावर प्रवास करु नये अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे . वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आलमट्टीचा विसर्ग पाच लाख क्‍युसेक आहे, तर कोयनेचा विसर्ग 45 हजार 267 आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहाव्या दिवशीही बंद होता. आज वाहतूक सुरु होण्याची शक्यता आहे. 

महापुरातून 
- खोची-भेंडवडे परिसरातील पूरस्थिती नियंत्रणात 
- दहा लाखांची औषधे बारामतीतील उद्योजकाकडून कोल्हापुरात दाखल 
- कोल्हापूर जिल्ह्यासाठी 25 कोटींचा पूरनिधी 
- जिल्ह्यातील 229 गावांतून एक लाख 11 हजार 365 नागरिकांचे स्थलांतर 
- शहरात तब्बल सहा दिवसांनी पडला प्रकाश; वीजपुरवठा सुरळीत 
- शहरात 23 हजार 989 नागरिकांचे स्थलांतर 
- पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण लक्ष शिरोळवर 
- लष्कराच्या आणखी 14 तुकड्या आज शिरोळमध्ये दाखल 
- शहरासह आंबेवाडी, प्रयाग चिखली येथील मदतकार्य पूर्ण 

पुरामुळे 203 रस्ते बंदच; अत्यावश्‍यक मदतीसाठी "ग्रीन कॉरिडॉर' 
पुरामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात एकूण 203 रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. पूरग्रस्तांना अत्यावश्‍यक मदत पोचविणाऱ्या वाहनांसाठी "ग्रीन कॉरिडॉर' करून देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड-खडगाव रस्ता आणि पन्हाळा-ज्योतिबा रस्त्यावर दरड कोसळली आहे. 

एसटीच्या फेऱ्या रद्द 
अतिवृष्टीमुळे रस्ते आणि पूल बंद असलेल्या मार्गांवर एसटीच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. सांगली जिल्ह्यात 43 मार्गांवर आठ हजार 60 फेऱ्या रद्द, तर कोल्हापूर जिल्ह्यात 31 मार्गांवर 29 हजार 517 फेऱ्या रद्द आहेत. 

वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न 
कोल्हापूर जिल्ह्यातील 9 उपकेंद्र, 453 रोहित्रे दुरुस्त करण्यात आली असून, 56 हजार 326 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. तसेच, सांगली जिल्ह्यात एक उपकेंद्र, 217 रोहित्रे दुरुस्त करून दहा हजार 404 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू केला आहे. पाणी ओसरल्यानंतर महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लागणारे साहित्य तयार ठेवले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water level in Panchganga river is reduced Kolhapur